पान:परिचय (Parichay).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६ )

यदुनाथजी थत्ते ह्यांनी केले. ह्या पुस्तकातील लेखांची सर्व कात्रणे गुरुजींच्या घरी उपलब्ध झाली. ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याची संमती श्रीमती प्रभावती कुरुंदकरांनी दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
 कुरुंदकर साहित्य प्रकाशन संस्थेचे हे तिसरे पुस्तक वाचकांच्या हाती देताना मधे वर्ष-सव्वावर्षाचा काळ उलटून गेला. त्यामुळे 'नरहर कुरुंदकर प्रकाशन संस्थे ' च्या सभासदांकडून पुढील पुस्तकाची वारंवार विचारणा होऊ लागली. १९८४ साली अस्तित्वात आलेल्या ह्या संस्थेने पाच वर्षांत पाच पुस्तके देण्याचे मान्य केले होते. तो संकल्प आम्ही आज इंद्रायणी साहित्य प्रकाशनाचे सहकार्याने एकदम तीन पुस्तके प्रसिद्ध करून तीन वर्षांच्या आतच पुरा करीत आहोत ह्याचे आम्हाला समाधान आहे.
 कागद आणि छपाई ह्याचे दिवसेंदिवस वाढत जाणारे दर समितीने गृहीत धरले होतेच, पण हे दर आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक वाढले. सभासदांना पाच पुस्तके द्यावीत ह्या वचनाला आम्ही बांधले गेलो होतो. अशा वेळी माझे मित्र इंद्रायणी साहित्याचे प्रकाशक श्री. श्याम कोपर्डेकर मदतीला धावून आले नसते तर हा संकल्प पूर्ण करणे आम्हाला केवळ अशक्य होते. नरहर कुरुंदकर साहित्य प्रकाशन संस्थेच्या वतीने मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
 ह्यानंतरही कुरुंदकर गुरुजींची चार-पाच पुस्तके निघतील एवढे त्यांचे असंग्रहित लेखन उपलब्ध झाले आहे. संस्थेने स्वत: पुस्तके प्रसिद्ध करावयाचे थांबवले असले तरी ह्यापुढे पुस्तके प्रसिद्ध होतील. ती जबाबदारी इंद्रायणी साहित्याने स्वीकारली आहे. म्हणून समितीने ह्यापुढील लेखांच्या पुस्तकरूपाने प्रकाशनाची जबाबदारी श्री. श्याम कोपर्डेकर ह्यांच्यावर सोपवली आहे.

 पुस्तक अल्पावधीत छापण्याची जबाबदारी स्मिता प्रिंटर्सचे मालक श्री. प्रमोद बापट आणि त्यांचा सेवकवर्ग ह्यांनी पार पाडली. सुबक असे मुखपृष्ठ श्री. रविमुकुल ह्यांनी दिले त्याबद्दल ह्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.


दत्ता भगत