पान:परिचय (Parichay).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रपाणि । ६९

 कृष्णमुनी डिंभ सांगतो की, जैनांनी वेदमार्गाचे उच्छेदन केलेले होते; राजे जैनधर्मीय झालेले होते; म्हणून जैन धर्माचे उच्छेदन करून वेदमार्ग स्थापन करणे आणि वेदकर्माचरण पुन्हा एकदा मार्गी लावणे हे काम चांगदेव राऊळांनी केले. बदरिकाश्रमी नारायण या नावे जो परमेश्वर राहतो, त्याचा चांगदेव राऊळा अवतार आहेत. इतरही महानुभाव-सांप्रदायिक चक्रधरांनी उत्तरापंथे गमन केले, ते उत्तरापथात बदरिकाश्रमात राहतात, असे मानतात. आणि बदरिकाश्रम हा उत्तरमीमांसेचे आचार्य बादरायण यांचा आश्रम म्हणून प्रसिद्ध आहे. चक्रधर बदरिकाश्रमात राहतात. नरनारायणांपैकी नारायण बदरिकाश्रमात राहतो. चांगदेव राऊळ बदरिकाश्रमातून आले. चांगदेव हेच चक्रधर. ते बदरिकाश्रमी परत गेले. ही संगतीही आपण लक्षात घेतली पाहिजे. शके १५६० मधील मयंकसुत मुरारा अस सांगतो की, महानुभाव तत्त्वज्ञान न्यायशास्त्राचा भाग आहे; जे न्यायशास्त्राचे आचरण करतात, त्यांना मोक्ष मिळतो. कृष्णमूनी डिंभसूद्धा हीच माहिती देतो. हे न्यायशास्त्र म्हणजे गौतमाचा न्याय हे षड्दर्शनातील वेदप्रामाण्य स्वीकारणारे आणि जैन-बौद्धांच्या विरोधात वैदिक मार्गाचा पुरस्कार करणारे प्रमुख दर्शन आहे. शुकादेवचरित्र या ग्रंथाचा लेखक महानुभावदर्शन हा न्यायशास्त्राचा भाग आहे, याची पुन्हा नोंद करतो. आणि ही नोंद अनेकांनी केलेली आहे. प्रामुख्याने नैयायिक आणि वैशेषिक हे शैव असल्याचा सार्वत्रिक पुरावा आहे.
 चौथे कृष्ण गुंडम राऊळ यांनी जो संन्यास स्वीकारला, तो बारा वर्षे वेदाभ्यास केल्यानंतर. त्यांचा संन्यास शांकर परंपरेशी निगडित असणाऱ्या गोवर्धनपीठ परंपरेतील आहे. गोविंदप्रभूचा संन्यास शांकर परंपरेतील आहे, असेही महानुभाव मानतात. महानुभावांचे असेही मत आहे की, शंकराचार्यांना दत्तात्रेयप्रभूंनी ' तुझे दर्शन मान्य होईल,' असा आशीर्वाद दिला होता. दर्शनप्रकाशकार सांगतो, शंकराचार्यांचे चार शिष्य. त्यांच्यापासून तीर्थ, अरण्य, आनंद आदी दहा नावांचे संन्यासी आणि तेरा महानुभावांचे आम्नाय निर्माण होतात. या सर्वांनाच दत्तात्रेयाचा आशीर्वाद आहे. आणि दत्तात्रय हीच त्यांची अधिष्ठात्री देवता आहे. या सगळ्या बाबी ऐतिहासिक तथ्य म्हणून स्वीकारायच्या की नाही, हा निराळा मुद्दा असून महानुभाव काय मानतात, हा निराळा मुद्दा आहे. जर महानुभाव स्वतःला न्यायदर्शनाशी आणि शांकर परंपरेशी निगडित मानीत असतील, तर मग त्यांच्या इच्छेनुसार वैदिक म्हणून त्यांना मान्यता दिली पाहिजे. ढेरे यांनी असा उल्लेख केलेला आहे की, महानुभाव तत्त्वविवेचनात नैयायिकांची परिभाषा वापरतात. या मुद्द्याविषयी माझे मत असे आहे की, महानुभावांची विचार मांडण्याची पद्धत आणि भूमिका मीमांसकांची आहे. ते अद्वैती नसले, तरी द्वैती मीमांसकच आहेत. उत्तरकालात सर्व वेदान्तीच न्यायाची परिभाषा वापरतात; तशी महानुभावही वापरतात. दर्शन-