पान:परिचय (Parichay).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६८ । परिचय

त्यांत अनेकदा उपनिषदे आधार म्हणून मानलेली असतात. इ. स. १७८६ साली महानुभावांनी आपल्यावर अन्याय झाला, अशी तक्रार शंकराचार्यांच्याकडे केलेली आहे. त्यांचे म्हणणे असे की, आपण चार वेद आणि भगवद्गीता ईश्वरीय आहेत, असे मानतो, तरीही आपल्यावर अन्याय होत आहे. हंपी विरूपाक्षचे पीठ स्वतःला शृंगेरीचे अनुयायी मानते. या पीठाच्या शंकराचार्यांनी असा निर्णय दिलेला आहे की, महानुभाव पंथाला पूर्वीपासून म्हणजे गौडपाद शंकराचार्यांपासून मान्यता आहे. तेव्हा त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये. महानुभावांनी फिर्याद घेऊन शंकराचार्यांकडे जावे, ही घटनाच ते स्वतःला आचार्यपीठाचे अनुयायी समजत असल्याची द्योतक आहे आणि शंकराचार्यांचीही समजूत ते पुरातन काळापासून आपलेच अनुयायी आहेत अशी आहे.
 हिंदू धर्माची रचना मोठी गुंतागुंतीची आहे. ज्यांना वेदांचा अधिकार नाही, किंबहुना ज्यांनी वेदश्रवण करणे हाही गुन्हा आहे, तेही वैदिकधर्मानुयायी आहेत. ज्यांनी वेळोवेळी हरिनामस्मरणाच्यापेक्षा वेदपठण आणि वैदिक यज्ञयाग कसे क्षुद्र आहेत हे मुद्दाम सांगितले, तेही वैदिक धर्माचे अनुयायी आहेत. जे श्रुतिप्रामाण्य मान्य करीत नाहीत, फक्त शैवागम मान्य करतात, तेही वैदिक धर्माचेच अनुयायी आहेत. कारण शैवागमांचे ग्रंथ आपण वैदिक तत्त्वज्ञान सांगतो व वेदरहस्य सांगतो, असे मानतात. यामुळे महानुभाव स्वत.ला हिंदू मानतात, तर त्यांना हिंदू म्हणून मान्यता द्यावी लागते. आणि ते जर स्वतःला कर्मकांडावर विश्वास नसणारे कृष्णोपासक पण वेदानुयायी मानत असतील, तर त्यांना वैदिक म्हणून मान्यता द्यावी लागते, अशी परिस्थिती आहे. महानुभाव वैदिक आहेत की नाहीत, या प्रश्नाचे उत्तर संशोधक काय मानतात या पद्धतीने देता येणार नाही; महानुभाव काय मानतात, या पद्धतीने द्यावे लागेल.

 या संदर्भात ढेरे यांनी पुढे मांडलेला पुरावा गंभीरपणे विचारात घेतला पाहिजे. महानुभाव डिंभ कवी असे मानतो की, रिद्धपूर हे महान तीर्थक्षेत्र आहे. आणि या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य असे विलक्षण आहे की, जो या तीर्थक्षेत्रात श्रद्धापूर्वक जाईल त्याला पदोपदी अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होईल. कृष्णमूनी डिंभ याच्या या विधानाला, यज्ञ करणे पुण्यप्रद आहे आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्य फार मोठे आहे असे गृहीत धरल्याशिवाय अर्थप्राप्तीच होत नाही. पण ढेरे यांनी मांडलेला पुरावा अशा प्रकारचा नाही. त्यांनी दिलेल्या पुराव्यात अनुमाने करण्याची गरज नाही. इतके स्पष्ट उल्लेख अनेक लेखकांच्या व महानुभाव लेखकांच्या लिखाणातून त्यांनी दिलेले आहेत. महानुभाव लेखकांच्या मते चांगदेव राऊळ हे तिसरे कृष्ण आहेत. राऊळ ही लकुलीश शैवांचीच एक शाखा आहे आणि लकुलीश शैव स्वतःला वैदिक म्हणवतात.