पान:परिचय (Parichay).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६६ । परिचय

आढळणारी भिकोबा, भिकुबाई ही नावे भिक्षूपासून आलेली असून हा बौद्ध परिणामांचा अवशेष आहे, हेही त्यांनी दाखवून दिलेले आहे. महानुभावांच्या वाङमयात पुर हा शब्द देह या अर्थाने दिसतो. डोळ्यांवर हात ठेवून डोळे झाकावेत, याला लीळाचरित्रात रात्री हा शब्द वापरलेला दिसतो. हे दोन्ही शब्द काश्मीरी शैव परंपरेत रूढ असलेले स्वच्छंद तंत्रातील शब्द आहेत. ढेरे यांच्या विवेचनात ओघाओघाने असे अनेक शब्दांचे खुलासे होत जातात. शब्दविचार हा प्रबंधात त्यांचा विषय नाही, तरीही त्यांनी शब्दांची जी स्पष्टीकरणे दिली आहेत ती याबाबत चिंतनाला नवनव्या दिशा उपलब्ध करून देणारी आहेत, हे आपण मान्य केले पाहिजे.
 ढेरे यांच्या प्रबंधात नानाविध चर्चांना जन्म देणारे मुद्देही विपुल आहेत आणि कोणताही मुद्दा सरळ मान्य न करता त्याला फाटे फोडण्याची माझी इच्छाही अतिशय प्रबळ. यामुळे असे वाटते की, ढेरे यांच्या प्रबंधाच्यापेक्षा आकाराने दुप्पट असा ग्रंथ जरी लिहिला, तरी त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची चर्चा सुविहीतपणे करता येणार नाही. अभ्यासाच्या नानाविध दिशांना जन्म देणाऱ्या प्रतिभाशाली संशोधकाचे सगळे विवेचनच असे विचारप्रवर्तक असते. म्हणून मी या प्रबंधातील नानाविध विवाद्य बाबी बाजूला सारून, काही ठळक मुद्द्यांच्याविषयी थोडक्यात माझ्या प्रतिक्रिया द्यायच्या, असे ठरवीत आहे. कारण, असे काहीतरी ठरविल्याशिवाय या प्रस्तावनेचा कुठे शेवट करता येईल, असे मला दिसत नाही.

 'शिल्पशास्त्र' हा ग्रंथ नेमका कोण्या काळातील आहे, यावर ढेरे यांनी मत दिलेले नाही. ग्रंथात असे लिहिलेले आहे की, हा ग्रंथ शके ११६५ चा आहे. ढेरे म्हणतात, जर हा ग्रंथ इतका प्राचीन असेल, तर मग त्यातील उल्लेखांचे महत्त्व फार मोठे आहे. हा ग्रंथ इतका प्राचीन नाही, हे अगदी उघड आहे. भाषेवरून पाहता हा ग्रंथ पंधराव्या शतकाच्या नंतरचा दिसतो. फार तर तो पंधराव्या शतकातील असेल. या ग्रंथाची एकदा कालनिश्चिती व्हायला पाहिजे. पण ही माहिती पंधराव्या शतकातील म्हटली, तरी त्यामुळे तिचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. विसोबा हे पांचाळ सोनार आहेत, म्हणजेच विश्वकर्मा ब्राह्मण आहेत, हे नाकारता येत नाही. लिंगायत वीरशैव एका विशिष्ट पंचमुख शिवाची उपासना करतात. हाच पंचमुख शिव चांगा वटेश्वर आणि विसोबा यांचा उपास्य देव आहे. लिंगायत संप्रदायाने पंचमुख शिवाला मान्यता दिलेली असली, तरी ती केवळ लिंगायतांची देवता नाही. शिव पंचमुख असल्याची कल्पना प्राचीन आहे. तिथून ती वीरशैवांनी स्वीकारलेली आहे. अगदी वीरशैव हा शब्द जरी घेतला, तरी त्यामागे एक परंपरा आहे. जैन स्वत:ला वीर मानतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, इतरांच्याविरुद्ध लढण्यासाठी जे धैर्य लागते, त्यापेक्षा स्वतःविरुद्ध लढण्याला अधिक धैर्य लागते.