पान:परिचय (Parichay).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६४ । परिचय

आणि नामदेवांचे बालपण नरसी बामणीत जवळ असलेल्या आजेगावच्या केशवराजाची उपासना करताना गेलेले आहे. तेव्हा नामदेवांना विसोवांचा उपदेश औंढा येथे होणे रास्त आहे. अभंगात तशी परंपरा आहे. याहून भिन्न परंपरा असणारे अभंग हे उत्तरकालीन समजुतीचे द्योतक मानले पाहिजेत. हाच नियम इतर सर्वांना लागू केला पाहिजे. गोरखनाथांच्या नावे जवळजवळ सर्व देशी भाषांमधून स्फुट वाङमयरचना आहे. पण त्यांची प्रधान ग्रंथरचना संस्कृत आहे. या प्रधान ग्रंथरचनेशी विसंवादी अशा सर्व स्फूटांतील माहिती आपण उत्तरकालीन समजूतीचा भाग मानली पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या नावे असणाऱ्या 'पंचीकरण' या ग्रंथातील माहिती अगर अभंगांतील माहिती व मुक्ताबाईच्या नावे असणाऱ्या स्फुटातील माहितीसुद्धा अशाच प्रकारे उत्तरकालीन समजुतीचा भाग मानली पाहिजे. ढेरे यांचे संशोधन परंपरागत समजूतीत उलथापालथ करीत निघालेलेच आहे. आणि ही उलथापालथ होणे सत्य उघडकीस येण्याच्या दृष्टीने आवश्यकही आहे. अशा वेळी परंपरागत समजूती आणि परंपरागत माहिती यांच्यावर किती विसंबून राहायचे, याविषयी नव्यानेच विचार केला पाहिजे, असे आता वाटू लागले आहे.
 आजतागायत आपण ज्या अनेक समजुती गृहीत धरीत आलो, त्यांत प्रचंड उलथापालथ करणारा आणि तेराव्या शतकातील धर्मसंप्रदाय आणि वाङमय यांच्याविषयी आमूलाग्र नूतन विचार करण्यास भाग पाडणारा असे ढेरे यांचा हा अपूर्व प्रबंध आहे. या प्रवंधामधील अगदी ठळक मुद्दे जर सांगायचे असतील, तर ते हे आहेत की, विसोवा खेचर हे वटेश्वर-सांप्रदायिक असून चांगा वटेश्वर हे गोरखनाथांची शिष्या मुक्ताबाई हिचे शिष्य आहेत. त्या मानाने ज्ञानेश्वर-भगिनी मुक्ताबाई आणि चांगा वटेश्वर यांचा संबंध आनुषंगिक आहे, दुसरे म्हणजे मुकुंदराजांचे आजेगुरू हरिनाथ आणि चक्रधर या दोन व्यक्ती एकच आहेत. ढेरे यांच्या या प्रमुख भूमिका पुरेशी उलथापालथ करणाऱ्या आहेतच; पण या भूमिका मांडताना ओघाओघाने जे विवेचन केलेले आहे, तेही चिंतनाला नवीन सामग्री देणारे आहे.
 कोणे एके काळी ज्ञानेश्वरीत ज्ञानदेव स्वतःचा उल्लेख निवृत्तिसुत करतात, हा मुद्दा वादाचा झालेला होता. निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे गुरू की पिता, असा तो वाद होता. शिष्याचा सुत म्हणून उल्लेख करण्याची पद्धत आहे, असे सांगून हा वाद मिटवला गेलेला आहे. पण तेराव्या शतकात गुरूचा पित्याप्रमाणे उल्लेख करण्याची प्रथा असल्याचे फारसे पुरावे यापूर्वी देण्यात आले नव्हते. विसोबा खेचर स्वतःला कृष्णाचा सुत म्हणवतात, कृष्णाचा कुमर म्हणवतात. गोरखनाथांना मत्स्येंद्रनाथांचा पूत्र म्हटले जाते. विसोबा मुक्ताबाईला गोरखनाथांची कन्या म्हणतात; शिष्यपरंपरेला वंश म्हणतात. हे सगळे जवळपास समकालीन उल्लेख