पान:परिचय (Parichay).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रपाणि । ६३

पद्धतीने अभंगरचना करतो. काही वर्षांनंतर शेवटच्या नाममुद्रेमुळे हा नामदेवाचाच अभंग मानला जाऊ लागतो. हे स्वप्नरंजन पंधराव्या शतकातच घडते, असे नाही; कोणत्याही शतकात घडते. आणि नामदेवांच्याच विषयी घडते असे नाही, तर कोणत्याही साधुसंताविषयी घडते. म्हणून या सगळ्याच अभंगवाणीकडे पुरावा म्हणून न पाहता वारकरी संप्रदायातील समजुती म्हणून पाहिले पाहिजे. विसोबा खेचर शके १२३१ ला समाधिस्थ झाले, असे म्हणू नये, तर अशी एक परंपरा आहे, इतकेच म्हणावे. ही परंपरा सत्याच्या जवळ नेणारी असेलच असे नाही. ती भ्रामक समजूतही असेल.
 आपण परंपरेने चालत आलेली माहिती प्रथम स्वीकारतो. आणि नंतर निश्चित पुराव्याच्या आधारे परंपरेतील काही माहिती सुधारीत पुढे जातो. या पद्धतीने विचार करण्याला एक महत्त्व आहे. पण याखेरीज दुसऱ्याही पद्धतीने विचार केला पाहिजे. आपण निर्णायकरीत्या स्वीकारीत असलेल्या माहितीला आधार गृहीत धरून काही नवे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. विसोबांच्या नावे असणाऱ्या अभंगांच्यामध्ये जी माहिती षट्स्थलाच्या विरोधी जाईल ती आपण नाकारतो आहो; पण इतकेच करणे पुरेसे नाही. कधी तरी आपण षट्स्थलातील माहिती आधार म्हणून घेतली पाहिजे व विसोबा खेचर वारकरी संप्रदायात आले यालाच पुरावा काय, असे विचारले पाहिजे. वारकरी संप्रदाय उदार व समावेशक भूमिका घेणारा संप्रदाय आहे. सगळ्याच देवता आणि सगळेच संत आपलेच आहेत, असे वारकरी मानतात. दासगणूमहाराज हे वारकरी. त्यांची परंपरा वारकरी. पण ते समर्थ रामदास आपलेच आहेत, असे गृहीत धरून चालतात. दासगणंनी गुरू गोविंदसिंह आणि गुरू नानक यांना आपलेच मानले आहे. तुकडोजी महाराज हेही वारकरी. ते तर चक्रधरांनासुद्धा आपलेच मानतात. व्यापक औदार्य म्हणून हे चांगले आहे. पण ऐतिहासिक सत्य शोधताना या भूमिकेचा अडथळा होतो. विसोबा वारकरी कशावरून, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे आणि षट्स्थलावर वारकरी भूमिकेचे प्रभाव पुरावा म्हणून दाखविले पाहिजेत. पण षट्स्थलाचा कर्ता स्वत:ला सोपानदेवांचा किंवा ज्ञानेश्वरांचा शिष्य म्हणवीत नाही. तो स्वत:ला वटेश्वरसांप्रदायिक म्हणवतो. म्हणून अभंगातील माहिती रद्द मानली पाहिजे. षट्स्थलातील माहितीचा शिल्पशास्त्र या ग्रंथातील माहितीशी संबंध जुळतो. परंतु शिल्पशास्त्र हा ग्रंथ पुन्हा वैदिक परंपरेचा आहे. म्हणून या ठिकाणी वीरशैवांचे प्रभाव नोंदविले. तरी लिंगायत संप्रदायात ही माणसे होती, हे म्हणणे आपण टाळले पाहिजे.
 औंढा नागनाथ हे प्राचीन पाशुपत क्षेत्र आहे. शैव क्षेत्र म्हणून या क्षेत्राची प्राचीनता निर्णायक पुराव्याने सिद्ध आहे. हे गाव नरसी बामणीपासून जवळ आहे.