पान:परिचय (Parichay).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६२ । परिचय

उपदेश दिला नाही, ही कल्पनासुद्धा अशीच आहे, वेगळ्या भाषेत ही कल्पना मत्स्येंद्रच वीरशैव होते, असे सांगणारी आहे. मत्स्येंद्र अल्लमप्रभू, गोरक्ष यांच्या परस्परसंबंधाविषयी केवळ वीरशैवांच्या वाङमयावर विश्वास ठेवणे मला स्वतःला धोक्याचे वाटते. व्यक्तिशः नाथसांप्रदायिक वाङमयात जिथे गोरक्षनाथ पूज्य मानलेले आहेत, त्या ठिकाणी अल्लमप्रभू आणि गोरक्ष यांच्या संबंधाची छाया दिसल्याशिवाय गोरक्षांचा पराभव झाला, हे मी मान्य करणार नाही. ढेरे यांनी ज्या प्रश्नांचे विवेचन केलेले आहे, त्याही बाबत प्रत्येक तपशिलावर प्रत्येकाने सहमत झालेच पाहिजे, असा आग्रह धरता येईलसे, मला वाटत नाही.
 प्रक्षेपांकडे आणि प्रक्षिप्त वाङमयाकडे कर्मठ इतिहाससंशोधक ज्या नजरेने पाहतात, त्यापेक्षा मी पुष्कळच प्रेमाने व सहानुभूतीने पाहत आलो आहे. एखादे लिखाण प्रक्षिप्त ठरले म्हणजे ते विचारातच घ्यायचे नाही, ही प्रथा मला अयोग्य वाटते. क्षेपक वाङमय क्षेपक असते, याचा इतकाच अर्थ की, ते स्वतःला ज्या व्यक्तीचे व ज्या काळातले समजते, म्हणवून घेते, त्या व्यक्तीचे व त्या काळातले ते नसते. पण क्षेपक वाङमयसुद्धा कोणत्या तरी काळातले आणि कुणाचे तरी असतेच. नामदेवांच्या नावावर असणारे क्षेपक अभंग नामदेवांचे नाहीत आणि तेराव्या शतकातील नाहीत, हे जरी खरे असले, तरी हे अभंग सोळाव्या-सतराव्या शतकांत कुणी तरी रचलेले असू शकतात आणि ज्या काळातल्या या रचना आहेत, त्या काळातल्या समजुतीचा त्या पुरावा असू शकतात. संशोधनाच्या क्षेत्रात घोटाळा होतो तो हा की, ही अभंगवाणी एक मर्यादा सोडून पुरावा म्हणून वापरली जाऊ लागते. ढेरे यांच्या संशोधनाचा एक महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की, अभंगवाणीत प्रक्षेपांचे प्रमाण फार जास्त आहे. विसोबांच्या नावावर जे अभंग मोडतात, त्यांपैकी फारच थोडे अभंग विसोबांचे असावेत, असे मत ढेरे यांनीच दिलेले आहे. अभंगवाणीत प्रक्षेपांचे प्रमाण फारच जास्त असावे, याला एक वाङमयीन कारण आहे.
 नामदेवांच्या अभंगवाणीत स्वप्नरंजनाची प्रथा सुरू होते. नामदेव यात्रेला निघतात. त्यांना निरोप देण्यासाठी पांडुरंग वेशीपर्यंत येतो. वेशीत दोघे परस्परांना भेटतात. तिथे ज्ञानेश्वर पांडुरंगाची समजूत घालून त्याला परत पाठवतात. ही एक कल्पना आहे. ते एक स्वप्नरंजन आहे. ही प्रत्यक्षात घडलेली हकीकत नव्हे. पण अभंगांच्यामध्ये हे स्वप्नरंजन समोर घडत असलेल्या घटनांच्यासारखे चित्रित केलेले असते. या स्वप्नरंजनाच्या अभंगवाङमयातील परंपरेला एक कविसंकेत इतकेच स्थान आहे. याचा परिणाम असा होतो की, नामदेवांना अनुसरून वारकरी संप्रदायातील सर्वच जण स्वप्नरंजन करू लागतात. पंधराव्या-सोळाव्या शतकांतील एखाद्या वारकऱ्याला अमुक एक घटना नामदेवांच्या चरित्रात घडली असेल, असे श्रद्धापूर्वक वाटते. आणि मग तो जणू नामदेवच आपल्या चरित्रातली घटना सांगत आहे, अशा