पान:परिचय (Parichay).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रपाणि । ६१

नोंदविलेल्या काळाला मान्यता देण्यात ढेरे यांनी चक केलेली आहे. चांगा वटेश्वर यांच्यानंतरच विसोबा खेचरांचा काळ यायला पाहिजे. 'षट्स्थल' ग्रंथ 'तत्त्वसारा'च्या नंतरच जायला पाहिजे. म्हणून हा ग्रंथ शके १२३४ च्या नंतर केव्हातरी म्हणजे शके १२४० च्या सुमारास केव्हा तरी मानणे भाग आहे. अभंगांमध्ये असणान्या उल्लेखाच्या आधारे विसोबांचा समाधिशक निश्चित गृहीत धरणे बरोबर नाही. ज्ञानेश्वर आणि नामदेव समकालीन. नामदेव ज्ञानेश्वरांच्यापेक्षा काहीसे वडील. बहुतेक चार-पाच वर्षांनी वडील. परंपरागत हकीकत जर मान्य करायची, तर नामदेवांनी विसोबांना गुरू केले तेव्हा विसोबा पुरेसे वृद्ध होते. त्यांचे गुरू रामकृष्णनाथ; त्यांचे गुरू चांगा वटेश्वर. म्हणजे चांगा वटेश्वर ज्ञानेश्वरांच्या भेटीला आले त्या वेळी अतिशय वृद्ध ठरतात. या चांगदेवांनी अतिवृद्ध काळापर्यंत ग्रंथरचना करू नये, हे आश्चर्यकारकच म्हटले पाहिजे. थोडक्यात सांगायचे, तर असे म्हणता येईल की, अजून या सर्वांच्या कालविषयक प्रश्नाचा समाधानकारक उलगडा झालेला नाही. काही वेळेला ढेरे आपणच सगळ्या परंपरेत केलेली उलथापालथ विसरून जातात व परंपरामान्य काळ स्वत: मान्य करू लागतात. या पद्धतीशी सर्वच जण सहमत होतील, असे मानण्याचे कारण नाही.
 ढेरे यांनी अल्लमप्रभूंनी गोरक्षनाथांचा पराभव केला, ही घटना विश्वसनीय मानलेली आहे. अल्लमप्रभू आणि मत्स्येंद्रनाथ यांची भेट घडलेली असण्याची शक्यता गृहीत धरलेली आहे. मला या दोन्ही कल्पना मान्य नाहीत. एका धर्मसंप्रदायात इतरांच्याविषयी काय माहिती असेल, त्यावर मी जपूनच विश्वास ठेवतो. आधुनिक काळात पराभव या कल्पनेला जो अर्थ आहे, त्याहून प्राचीन भारतीय इतिहासात पराभव या कल्पनेला निराळा अर्थ आहे. मंडन मिश्र हे पूर्वमीमांसक; त्यांचा शंकराचार्यांनी पराभव करताच ते उत्तरमीमांसक शंकराचार्यांचे शिष्य सुरेश्वराचार्य होऊन जातात. एखाद्या वेळी पराभूत नेता देहत्याग करतो. अल्लमप्रभू यांनी जर गोरक्षनाथांचा पराभव केलेला असेल, तर मग आपल्याला अशी परंपरा दाखवता यायला पाहिजे की, ज्या ठिकाणी गोरक्षनाथांचे काही शिष्य स्वत:ला गोरखनाथांचे शिष्य, गोरक्षांना अल्लमप्रभूंचे शिष्य असे मानतात. अल्लमप्रभू-→गोरक्षक्ष अशी परंपरा आपणाला दाखवता यायला पाहिजे. आणि या परंपरेतील क्ष अल्लमप्रभूंचे तत्त्वज्ञान व उपासना चालविणारा असला पाहिजे. अल्लमप्रभू हे महान योगी व दैवी पुरुष होते. त्यांचा अनेकांवर प्रभाव पडलेला आहे. गोरक्षनाथ हेही अखिल भारतीय प्रभाव असणारे योगी आहेत. दोघेही शैव परंपरेतून उदयाला येतात. श्रीपर्वतावर दोघे राहिलेले असण्याचा बळकट संभव आहे. निश्चितपणे गोरक्षनाथांचे मानता येईल असे वाङ्मय उपलब्ध नाही. म्हणून गोरखनाथांवर अल्लमप्रभूंचा प्रभाव दाखवता येणे शक्य नाही. मत्स्येंद्रनाथांनी अल्लमप्रभूंना लिंग दिले; पण