पान:परिचय (Parichay).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५० । परिचय

संबंध आहे, त्या प्राकृतावर जैनांचा प्रभाव फार मोठा असल्यामुळे मराठीत संस्कृत शब्द स्वीकारून तिचे संस्कृतीकरण करण्याची प्रक्रिया फार मंद आहे. याच तेराव्या शतकात संस्कृतातील तत्त्वज्ञान मराठीत मांडण्याचा एक जोरकस प्रयत्न ज्ञानेश्वरीद्वारे होतो. हा प्रयत्न सुरू होताच भाषेत संस्कृतीकरण म्हणजे तत्सम शब्दांचा भरणा वाढतो. तेराव्या शतकातीलच लीळाचरित्राची भाषा आणि ज्ञानेश्वरीची भाषा तुलनेसाठी समोर ठेवली, म्हणजे हा फरक जाणवू लागतो. अगदी महानुभाव काव्य जरी घेतले, तरी त्या काव्यात तत्सम शब्दांचा आग्रह ज्ञानेश्वरीइतका दिसत नाही. म्हणून माझे असे मत आहे की, जरी संस्कृत शब्द 'षट्स्थल' हा असला, तरी ज्या मराठीत विसोबा लिहीत आहेत, तिच्यातील सर्वपरिचित रूप ' शडस्छळ ' हेच आहे. आणि तेच प्रतकाराला अनुसरून ग्रंथनाम म्हणून स्वीकारायला पाहिजे. डॉ. कोलते यांनी आग्रहाने ' वत्साहरण' हे नाव टाळून 'वछाहरण' हे नाव स्वीकारले आहे, ते याच कारणामुळे. मला स्वत:ला मुद्दाम या ग्रंथाचे नाव आपल्या जिभेला सोयीस्कर व्हावे म्हणून 'षट्स्थल ' गृहीत धरणे चुकीचे वाटते.
 शब्दांच्या रूपांबाबतचा हा मुद्दा एका शब्दाबद्दल नाही, तो अनेक शब्दांबद्दल आहे. एकीकडे विसोबा ' स्वयंज्योती', 'पिंडब्रह्मांडनायक', 'करुणाकर' असे शब्द वापरतात, तर दुसरीकडे ते 'विघ्नहर' म्हणण्याऐवजी 'विघ्नेहरा' असा शब्दप्रयोग करतात. 'विद्या' म्हणण्याऐवजी 'विदया' आणि 'शोभती' म्हणण्याऐवजी 'सोभती' असा शब्दप्रयोग करतात. ग्रंथभर पसरलेल्या एकूण शब्दकळेचा तत्सम शब्द, तत्सम शब्दांचे प्राकृतरूप तद्भव शब्द असा विविध प्रकारचा विलास आहे. ही सगळी शब्दकळा प्रतकाराच्या अडाणीपणाशी निगडित असेलच असे नाही. या शब्दकळेच्या विशिष्ट रूपांचा संबंध तेराव्या शतकातील मराठीशी आहे. म्हणून उगीच संस्कृतीकरणाचा आग्रह न धरता, उपलब्ध प्रत आहे तशी स्वीकारून तिची भाषिक तपासणी केली पाहिजे. म्हणजे त्यावरून प्रतकारांचे हात फिरत असताना आधुनिकीकरण किती झाले आणि तरीही तेराव्या शतकाचे अवशेष किती उरले, याविषयीचे विवेचन करता येईल. ढेरे यांनी ग्रंथाची भाषिक तपासणी पुढच्या संशोधकांसाठी सोडून दिलेली आहे.
 पृष्ठ ६१ वर त्यांनी अशी नोंद केलेली आहे की, ग्रंथकार आपल्या ग्रंथाला 'मराठी टीका' असे म्हणतो. ग्रंथकाराने 'मी अनुवाद करीन' असेही म्हटले आहे; 'करीन मऱ्हाटी टीका' असेही म्हटले आहे. यावरून ढेरे यांचे अनुमान असे की, 'षटस्थल' हा ग्रंथ अन्य भाषेतील एखाद्या ग्रंथांचा अगर अनेक ग्रंथातील विवेचनाचा आधार घेऊन रचलेला असावा. मला स्वतःला मत देण्याची ही पद्धत फारशी रुचत नाही. एका ग्रंथाच्या आधारे रचलेला दुसरा ग्रंथ हा अनुवाद या शब्दाचा अर्थ प्रसिद्ध आहे. अनेक ग्रंथांतील विवेचन आधारासाठी घेऊन जो ग्रंथ रचलेला