पान:परिचय (Parichay).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चक्रपाणि । ४५

बाबत उपलब्ध होणे अडचणीचे जाते. अशा वेळी जी प्रत उपलब्ध झालेली आहे; तिच्यावरून अनेक प्रतकारांचा हात फिरलेला असतो. हा प्रतकारांचा हस्तस्पर्श जाणता अगर अजाणता भाषेची रूपे बदलतो; पूष्कळदा पूज्य ग्रंथांच्या बाबत प्रक्षेपांना कारण ठरतो. प्राचीन मराठी वाङमयात प्रक्षेपांचा स्पर्श झालेला नाही असा वंदनीय ग्रंथ मिळणे कठीणच आहे. म्हणून वाङमयीन पुराव्याबाबत पहिली अडचण जर जाणवत असेल, तर ती ही आहे की, मूळ लेखकाच्या लिखाणाचे अविकल विश्वसनीय रूप म्हणून उपलब्ध प्रतींच्याकडे पाहणे कठीण होऊन जाते. पण याबरोबर अजून एक महत्त्वाची बाब आहे. ती ही की, प्राचीन वंदनीयांच्या नावे ग्रंथलेखन करण्याची उत्तरकालीन लेखकांची प्रथाच आहे. यामुळे वाङमय ज्या व्यक्तीच्या नावे नोंदविलेले असेल, ते त्या व्यक्तीचे आहे की नाही, याविषयीच संदेह निर्माण होऊ लागतो. ज्ञानेश्वरांच्या नावे लिहिले गेलेले, पण तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरांचे नसलेले असे किती तरी वाङमय आपल्याला उपलब्ध झालेले आहे. माझ्या पाहण्यात तर निवृत्तिनाथांचा शिष्य असलेल्या ज्ञानेश्वरांची अशी एक गीताटीका येऊन गेलेली आहे, ज्या टीकाकाराने एकनाथ-तुकारामांच्यासह ज्ञानेश्वर-निवृत्तिनाथांनाही नमन केलेले आहे. प्रसिद्ध इतिहाससंशोधक कानोले यांच्या संग्रहात हे हस्तलिखित उपलब्ध आहे. क्षेपक वाङमयाचा हा विस्तार एकीकडे आणि अस्सल प्रमाण वाङमयातील प्रक्षेप दुसरीकडे, या दोन अडचणींमुळे वाङमयीन पुरावा हाताळणारे संशोधक जर जवाबदारी ओळखून संशोधन करीत असतील, तर पुष्कळच सावधपणे वागण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
 या अडचणीतून मार्ग काढण्याचे जे अनेक प्रकार आहेत, त्यांतील एक प्रकार, फारशी कीर्ती नसणाऱ्या लेखकांच्या साहित्याचा आधार, हा आहे. ख्यातकीर्त नसणारे हे लेखक केवळ अप्रकाशितच आहेत असे नसून, ते अप्रसिद्धही आहेत. त्यांच्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेलेले नाही. आणि म्हणून अशा लेखकांच्या वाङमयात प्रक्षेपांची गरज कुणाला फारशी पडली नाही. या अप्रसिद्ध ग्रंथांचा आधार जागोजाग ख्यातकीर्त लेखकांच्या लिखाणातील न नोंदवलेले दुवे जोडण्यासाठी घेणे हे ढेरे यांचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने मुद्रित आणि अमुद्रित वाङमयाशी ज्यांचा परिचय ढेरे यांच्याइतका गाढ आहे, असा दुसरा संशोधक चटकन दाखविणे कठीण आहे.
 ढेरे यांना वाङमयाचे प्रेम आहे. संशोधनाच्या क्षेत्रात आक्षेपार्ह ठरावे, इतके त्यांचे वाङमयाचे प्रेम जागोजागी उचंबळून येत असते. त्यांनाही स्वतःला प्रसन्न काव्यमय भाषेत लिहिण्याचा आता सराव झालेला आहे. पण या काव्यप्रीतीवर मात करील इतकी प्रबल अशी सांस्कृतिक इतिहासाची जिज्ञासा ढेरे यांना आहे. लोकजीवनात पसरलेले निरनिराळे लोकधर्म आणि त्यांच्या परंपरा, वेगवेगळे धर्मसंप्रदाय आणि या धर्मसंप्रदायांची विसरता न येणारी पार्श्वभूमी, लेखकांचे आणि वाङमय-