पान:परिचय (Parichay).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५. चक्रपाणि

प्राचीन मराठी वाङमयाचा एक भाग मुद्रित स्वरूपात आता उपलब्ध झालेला आहे. जे वाङमय छापले गेलेले आहे, त्याचे स्वरूप पुष्कळच अवाढव्य आहे. पण जे अजून छापले गेलेले नाही, पण उपलब्ध झालेले आहे, अशा मुद्रण- संस्कार न झालेल्या वाङमयाचे प्रमाण मुद्रित झालेल्या वाङमयापेक्षा किती तरी अफाट आहे. बहुतेक संशोधकांची एक ठरलेली प्रथा आढळते, ती म्हणजे त्यांना मुद्रित ग्रंथांच्यापैकी ख्यातकीर्त ग्रंथ बारकाईने माहीत असतात. उरलेले मुद्रित वाङमय फारसे परिचित नसते आणि अमुद्रित प्रचंड साहित्याशी त्यांचा परिचय त्या मानाने अल्प असतो. ढेरे यांचा एक प्रमुख विशेष असा आहे की, या सगळ्या साधनसामग्रीशी त्यांचा अतिशय गाढ परिचय आहे आणि हा सगळा परिचय भाबडेपणा वजा जाता सहानुभूतिपूर्वक पण डोळसपणे घडलेला

परिचय आहे. प्राचीन मराठी वाङमयातील आजपर्यंत छापले न गेलेले जे शेकडो, हजारो ग्रंथ उपलब्ध आहेत, ते सर्वच छापले पाहिजेत या दर्जाचे नाहीत. वाङमय म्हणून या ग्रंथांना फारसे महत्त्वाचे स्थान नाही. पण जे ग्रंथ काव्य म्हणून महत्त्वाचे नसतात, त्यांचे सांस्कृतिक इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व फार अपार आहे, याची जाणीव ढेऱ्यांना आहे.
इतिहासाचा अभ्यास करताना जेव्हा वाङमयीन पुरावा आपण तपासतो, त्या वेळी दोन भिन्न प्रकारच्या अडचणी आपल्याला सतत भीती दाखवीत असतात. वाङमयीन पुरावा तपासताना उपस्थित होणारी पहिली व सर्वमान्य अडचण ही की, लेखकाच्या हातची प्रत या क्षेत्रात फार क्वचित उपलब्ध होते. किंबहुना कालदृष्ट्या मूळ लेखकाला जवळ असणारी प्रतसुद्धा प्रमुख ग्रंथांच्या