पान:परिचय (Parichay).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महानुभाव वाङमयाचे संशोधन । ४३
 

 माझी अशी धारणा आहे की, ह्या सगळ्या अभ्यासात आपण वाङ्मयीन पुराव्याला फार मोठे महत्त्व देत आहोत. आणि समाजशास्त्रीय पुराव्याला अगदीच टाळून देत आहोत. समाजशास्त्रीय पुरावा गोळा करण्याची जबाबदारी एक ना एक दिवस अभ्यासकांना स्वीकारावी लागेल. कारण हा पुरावा काळजीपूर्वक गोळा केल्याशिवाय एखाद्या धर्मसंप्रदायाचा अभ्यास पूर्ण होणारच नाही. महानुभावाची सर्व धर्मक्षेत्रे, त्या ठिकाणी चालू असणारे सर्व विधी व मंत्र, दीक्षितांचे एकूण आचार, अनुयायाचे सर्व विधी, सण, कुलाचार, विवाहपद्धती, संन्यास घेण्याचा विधी, अंत्यक्रिया असा जीवनाचा एकूण धर्मसंबंध भाग तपशिलाने प्रत्यक्ष पाहणी करून नोंदवावा लागेल. जर महानुभावांचे विवाह पंथाबाहेर होत असतील तर हिंदुधर्माचा एक संप्रदाय हे त्याचे रूप सिद्ध होईल. प्रत्यक्ष व्यवहारात रोटीबेटी संबंध करावे लागतील. असा सगळा ह्या संप्रदायाचा सामाजिक इतिहास पाहावा लागेल.

 आमच्या भागात काही ब्राह्मण कुटुंबे महानुभाव संप्रदायानुयायी आहेत. ह्या कुटुंबात कुणी संन्यास घेतला तर तो महानुभाव मठात जातो. एरव्ही श्राद्ध, विवाह, नाव ठेवणे अशा संस्कार प्रसंगी सर्व विधी वैदिक पद्धतीनुसार होतात. जेवणास महानुभाव संन्यासी असतो. संस्कारप्रसंगी महानुभावसंन्यासी आवश्यक असणे एवढा भाग सोडता ही कुटुंबे वैदिकच आहेत. इतरत्र काय परिस्थिती आहे याचा शोध घ्यावा लागेल. नव्या अभ्यासाचा हाही एक महत्त्वाचा भाग राहील. सतत वाढणारा अभ्यास व चिकित्सा अंतिमतः पंथीय व पंथेतर या सर्वांनाच हिताची ठरेल असा माझा विश्वास आहे.


🙝