पान:परिचय (Parichay).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३४ । परिचय
 

वेळ आली, गरज निर्माण झाली, सोयही झाली. मूठभर महंत मंडळी सोडल्यास पंथीयांना तरी पूर्वी पंथाचे ज्ञान कितीसे असणार ? धर्मजिज्ञासा निर्माण होणे, वाढणे, तिला योग्य वळण लागणे ह्यासाठीही ग्रंथ प्रकाशात असणे इष्टच असते.
 महानुभाव वाङमयाची व धर्मसंप्रदायाची ओळख करून देणे, सापडतील ते ग्रंथ छापणे या उद्योगाला ज्यांनी प्रारंभ केला ते प्राय: पंथेतर होते. ही मंडळी अनुसरण केलेली तर नव्हतीच, पण अनुसरणाची इच्छा असणारीही नव्हती. य. खु. देशपांडे, वा. ना. देशपांडे, नेने, भवाळकर, डॉ. कोलते व अलीकडे डॉ. पठाण ह्या अभ्यासकांचे स्वरूप असे आहे. ही ठळक नावे समजावयाची. ह्या अभ्यासकांची जिद्द सगळे वाङमय प्रकाशित करण्याची होती. ह्या प्रकाशनाला अडथळा येईल, असे काहीही करण्याची त्यांची इच्छा नव्हती. महानुभाव महंत परंपरेच्या वातावरणात वाढलेले होते. एकाएकी चिकित्सेचा प्रकाशझोत त्यांना मानवण्याजोगा नव्हता. चिकित्सेचे हे वैशिष्टयच आहे की, परंपरा तिच्यामुळे काही प्रमाणात हलतात, काही प्रमाणात श्रद्धांना धक्का बसतो. चिकित्सेचा हेतू उभयपक्षांनी सत्याला नम्रपणे सामोरे जाण्याचा मार्ग तयार करणे हा असतो. हेतूच्या विरुद्ध जर दुरावाच वाढू लागला तर चिकित्सेचा मूळ हेतू बाद होतो. महंतांचे मन न दुखविता चिकित्सेला आरंभ कसा करता येईल ह्याचा विचार करण्यात काही जणांचा जन्म गेलेला आहे.
 मी स्वत: महानुभाव वाङमयाच्या संशोधनात व अभ्यासात डॉ. कोलते ह्यांना सर्वांत जास्त महत्त्व व प्राधान्य देतो. भाऊसाहेब कोलते जे सांगतात ते काही डोळे मिटून आम्ही स्वीकारणार नाही. पारखूनच घेऊ. त्यांच्याही विवेचनात अशा जागा आहेत ज्यावर मतभेद होतील व व्हावेत. कारण चर्चा इष्टच असते. पण त्यामुळे कोलते ह्यांचे महत्त्व तिळमात्र उणावत नाही. पहिली गोष्ट अशी की, कोलते ह्यांनी इ.स. १९४५ मध्ये 'महानुभाव तत्त्वज्ञान आणि इ.स. १९४८ मध्ये 'महानुभावांचा आचारधर्म ' ही पुस्तके प्रकाशित केली. हे दोन्ही ग्रंथ संप्रदायाच्या आधारशिला ठरावेत इतक्या महत्त्वाचे आहेत. महानुभावाच्या तत्त्वज्ञानाचे इतके सविस्तर साधार विवेचन त्यापूर्वी अगर त्यानंतरही दुसरे कोणते नाही. दोन्ही ग्रंथांवर मान्यवर महंतांचे आशीर्वाद छापलेले आहेत. ज्यांच्या संप्रदायाचे हे आधुनिक मराठीत विवरण आहे त्यांनी नि:शंकपणे हे ग्रंथ वाचावेत व स्वतःचा धर्म समजून घ्यावा ह्यासाठी ह्याची गरज होती. कोलते ह्यांनी कुठेही स्वमतप्रतिपादन केलेले नाही. त्यांनी अतिशय काटेकोरपणे फक्त महानुभावांचे म्हणणे काय हे सांगितले व ह्या कार्यासाठी अक्षरशः हस्तलिखितांचे ढीग बारकाईने चाळले. कोलते ह्यांच्या ह्या कार्याला आता पंचवीस वर्षे उलटून गेलेली आहेत. त्यांच्या विवेचनात कुणाला भर घालता आली नाही. मतप्रदर्शन आणि चिकित्सा त्यांनी