पान:परिचय (Parichay).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महानुभाव वाङमयाचे संशोधन । ३३
 

ह्यांचा हेतू महानुभाव संप्रदायाकड़े नव्याने व प्रेमाने पाहण्याचा आहे. पण ते हरपालदेव हाच चक्रधर होय असे मानतात. त्यांना पुरस्वीकाराची कल्पनाच अमान्य आहे. त्यामुळे जुना हरपाळदेवच नव्या काळात वृत्तिपालट होऊन संत झाला असे ते मानतात. महाराष्ट्रात महानुभाव संप्रदाय अप्रिय आहे, असे तर त्यांचे मत आहेच, पण ह्याबद्दल त्यांनी महानुभावांनाच दोषी गृहीत धरले आहे. ते गोविंदप्रभूचा उल्लेखसुद्धा माणूस म्हणूनच करतात. अशा प्रकारच्या पाखंडी माणसाला सर्व ग्रंथ दाखविण्यासाठी महंतांना ५० वर्षांपूर्वी मन किती उदार करावे लागले असेल ह्याची कल्पना केली म्हणजे मी ह्या संदर्भात अहिंसेचा उल्लेख का करतो हे समजू शकेल.
 क्रमाने १९२० नंतर महानुभाव साहित्य प्रकाशात येऊ लागले. पण ह्या प्रकाशनाची गती मंदच होती. माझे मामा कै. नांदापूरकर हे मराठीचे अभिमानी व महानुभाव वाङमयाचे मोठे चाहते होते. त्यांनी मायबोलींची कहाणी हे काव्यमय वाङमयेतिहासाचे पुस्तक लिहिले आहे. डॉ. नांदापूरकर अनेकदा नरेंद्राच्या काव्याचे मोठे मार्मिक रसग्रहण करीत. ते स्वतःही त्यात रंगून जात. आम्हीही रंगत असू. पण त्यांच्या कहाणीत नरेंद्रावर कहाणी नाही. मी ह्याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, कहाण्या लिहितेवेळेस त्यांना नरेंद्राचे काव्य उपलब्ध नव्हते. म्हणजे नरेंद्रासारखा महाकवीसुद्धा इ. स. १९३० च्या सुमारास अभ्यासकांना दुर्लभ होता. प्रकाशनाची गती मंद असणे हे त्याचे कारण होते. संशोधकीय नियतकालिकात काय छापले आहे ह्याची वार्ता सर्वत्र पोहोचणे कठीणच असते.
 हे प्रकाशन मंदगतीने चालले तरी काही महत्त्वाचे परिणाम झालेले आहेत. मी स्वतः ह्यांतील तीन परिणाम महत्त्वाचे मानतो. पहिला परिणाम असा की, सर्वसामान्य मराठीचा नवशिक्षित अभ्यासक, महानुभावांनी केलेल्या मराठीच्या सेवेबद्दल कृतज्ञ असतो. महानुभाव वाङमयाच्या जिवंतपणामुळे व सौंदर्यामुळे तो ह्या वाङमयाच्या प्रेमात बुडालेला असतो. हजारो शहाणे समर्थक व चाहते नवमहाराष्ट्रात ह्या वाङमयप्रकाशनामुळे निर्माण झालेले आहेत. ह्या घटनेमुळे निंदकांचे कळप अतिशय रोडावलेही आणि हे कळप तुच्छही ठरले. साहित्यप्रकाशनाच्या निर्णयातून जो प्रेमलाभ ह्या संप्रदायाला उपलब्ध झाला, तो टिळक-भांडारकरांच्या समर्थन करणाऱ्या लेखांनी कधीही उपलब्ध होणे शक्य नव्हते. दुसरा परिणाम असा की, ह्या वाङमयाच्या प्रकाशनाने अभ्यासकांच्या कक्षा रुंदावल्या. त्यामुळे जैन, लिंगायत आदी संप्रदायांनी केलेल्या मराठीच्या उपासनेकडे वळण्यास प्रारंभ झाला. मराठी म्हणजे केवळ वैदिकांची नव्हे; ती महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या सर्वांची, ही जाणीव दृढ होण्यास व वाङमय समीक्षेतील सुप्त परंपरावाद वितळण्यास आरंभ झाला. तिसरा महत्त्वाचा परिणाम हा की, सांप्रदायिकांनाही अभ्यास करण्याची