पान:परिचय (Parichay).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३२ । परिचय
 

दावा आहे. हिंदू असण्यासाठी वैदिक असणे किती प्रमाणात आवश्यक आहे त्याची मात्र फारशी चर्चा कुणी करीत नाही. भारतीय संविधानानुसार महानुभाव हे हिंदू आहेत. कायद्याला एखादा संप्रदाय हिंदू असण्यासाठी वैदिक असण्याची आवश्यकता वाटत नाही असे, प्रथमदर्शनी तरी दिसते. पेशवाईपूर्वीच्या महाराष्ट्रात महानुभाव संप्रदाय व उरलेले हिंदू ह्यांचे परस्परसंबंध कसे होते हा मुद्दा बाजूला ठेवून दिला तरी इंपीरियल गॅझिटिअरच्या प्रथमावृत्तीला माहिती पुरविणा-या व्यक्तीचे मन स्वच्छ नव्हते इतके तात्पर्य शिल्लकच राहते. अलीकडच्या काळात विष्णुबुवा जोगांच्यापासून निंदा-नालस्तीच्या उपक्रमास प्रारंभ होतो. अशा प्रकारचे उपदव्याप कुणीही निंद्य व निषेधार्हच मानील. पण वाईटातून कधी कधी चांगले निर्माण होते असा अनुभव आहे. जोगांच्या सारख्या निंदकाचा प्रतिकार करायचा असेल तर त्याचा खरा मार्ग आपले उज्ज्वल वाङमय जनतेसमोर ठेवणे हा आहे, ह्या निर्णयावर महानुभाव महंत व मठाधिपती आले. हा कालमहिमा आहे. आपल्या उपदेशापासून सामान्य माणूस व स्त्रियाही वंचित राहू नयेत ही एक जाणीव या संप्रदायात कार्यरत होती. आपले धर्मरहस्य अश्रद्धांच्या हाती पडू नये ही दुसरी जाणीवही कार्यरत होती. पहिल्या जाणिवेतून मराठीचा अंगिकार, अभिमान व मराठी ग्रंथरचनेचा उदय होतो. दुसऱ्या जाणिवेतून सांकेतिक लिपीचा उदय होतो. इतिहास असा दिसतो की, सांकेतिक लिप्या व रचना ह्यांमुळे पंथेतरांना पंथाचे ज्ञान होऊ नये हा हेतू साध्य झाला, तरी संकेत लिपीच्या योगाने क्षेप-प्रक्षेपाला अडथळा मात्र निर्माण झाला नाही.
 महानुभाव महंतांनी आपले साहित्य जनतेसमोर ठेवण्याचा जो निर्णय घेतला तो धाडसी व क्रांतिकारक तर होताच, पण पंथाच्या भूमिकेतील मूलभूत अहिंसाधर्माशी सुसंगत होता. ज्या मंडळींच्या समोर हे वाङ्मयधन उघडे करायचे ती माणसे बुद्धीने समंजस व उदार होती व अंतःकरणाने परंपरावादी होती. ही परंपरावादी मंडळी एका मर्यादेपलीकडे निकोप मनाने महानुभाव संप्रदायाकडे पाहण्याची शक्यता कमी होती. पण बिनतक्रार हा धोका पत्करून महंतमंडळी ह्या विद्वानांकडे गेली. कधीतरी हा धोका पत्करणे भागच होते. पंथेतरांना संप्रदायाचे ज्ञान नाही म्हणून त्यांच्या मनात प्रेम नाही व ज्यांना प्रेम नाही त्यांच्याकडून पूर्ण न्याय अपेक्षिता येत नाही. तरीही ह्या मंडळींना ज्ञानाचे दरवाजे मोकळे करून दिले पाहिजेत. कारण आज ज्ञान दिले तरच उद्या नवे प्रेम निर्माण होणार हे उघडे गणित होते. आज प्रेम व विश्वास देऊन उद्याचे चाहते जिंकण्याचा हा प्रेममय मार्ग होता.
 मी काय म्हणतो ते थोडे उदाहरणाने स्पष्ट केले पाहिजे. ज्यांना महानुभाव महंतांनी विश्वासात घेतले त्यांच्यापैकी सारस्वतकार भावे हे एक जाडे विद्वान व मराठी साहित्याचा इतिहास लिहिणारे परिश्रमी गृहस्थ होते. सारस्वतकार भावे