पान:परिचय (Parichay).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
शक्तिपीठाचा शोध । २३
 

आहे. मला जर त्यांचा प्रमुख सिद्धान्त मान्य नसता, तर मी किमान दुप्पट पाने लिहन त्यांचे खंडन करणे आवश्यक मानले असते.
 ढेरे यांना एका उपासना-परंपरेकडे व त्या परंपरेतील परिवर्तनांच्याकडेपरंपरेच्या उन्नयन-रूपांतर-ऱ्हासाकडे लक्ष वेधायचे आहे. सर्व भारतभर अतिप्राचीन काळापासून अलीकडच्या काळापर्यंत एका विशिष्ट प्रकारच्या देवीच्या मूर्ती उपलब्ध होतात. या मूर्ती आसामपासून अतिदक्षिणेपर्यंत पसरलेल्या आहेत. त्यांचे काळही निरनिराळे आहेत. या मूर्तीचे स्वरूप कसे आहे ? त्यांना डोके नसते. त्या नग्न आणि उताण्या असतात. कुठे पुष्ट स्तन असतात, कुठे नसतात. पण योनिदर्शनाला प्राधान्य असते. त्याला उपकारक अशी पायांची रचना असते. शिरोहीनता, नग्नता व उत्फुल्ल योनी ही या मूर्तीची कायम वैशिष्ट्ये आहेत. ही देवता योनिरूपिणी महानग्ना जगन्माता आहे. तिची उपासना जरी पुत्रदायी देवता म्हणून होत असली, तरी ती खरे म्हणजे सर्व सृजनाचीच देवता आहे. ही देवताच लंजिका ऊफे लज्जागौरी असून नंदिकेश्वर हे मूळचे लंजिकेश्वर आहे व माकोट हे याच देवीचे नाव असून, त्यातील कोट' शब्दाचा अर्थ लंजिकेप्रमाणेच 'नग्ना' असा आहे. ढेरे यांना असे म्हणावयाचे आहे की, ही योनिमातृका म्हणजे नंदिकेश्वरची लंजिका, अलंपूरची युगुला ऊर्फ जोगुळांबा असून, तीच यल्लमा आणि रेणुका आहे.
 ही पुस्तिका म्हणजे यापुढे येणाऱ्या एका प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या विवेचनाचा प्रारंभ आहे. यापुढचा टप्पा हे सांगण्याचा आहे की, आसाममधील प्रसिद्ध कामाख्या हीच केवळ योनिमातृका नसून माहूरची रेणुकाही मुळात योनिमातृकाच असल्याचा पुरावा आहे. कारण रेणुका म्हणजे वारुळ. हे योनीचेच एक प्रतीक आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी याही मुळातच योनिमातृका असल्याचा पुरावा त्या मूर्तीच्या शिरोभागी आहे. सर्व भारतभर जसा शंकराच्या लिंगपूजेचा सार्वत्रिक संप्रदाय आहे तसा जगन्मातेच्या योनिपूजेचाही सार्वत्रिक आणि प्राचीन संप्रदाय आहे. देवीउपासनेच्या निमित्ताने हा संप्रदाय क्रमाने विकसित आणि रूपांतरित होत आला. या रूपांतरात काही टप्पे उन्नयनाचे आहेत. या टप्प्यांच्यामध्ये या देवता कधी उमेचे तर कधी लक्ष्मीचे रूप घेऊन विष्णुपत्नी, शिवपत्नी होतात. कधी त्यांची मूळ रूपे क्षुद्रदेवता आणि बालग्रह अशी रूपांतरित होतात. कधी मधूनच समाजाचा -हासकाळ देवतेच्या मूळ रूपाला भ्रष्ट प्रतिष्ठा मिळवून देतो. हे रूप शाक्त संप्रदायात दिसते. यानंतर ढेरे असे म्हणणार की, परशुराम-रेणुका, रेणुका-जमदग्नी यांच्याशी निगडित असणारा सर्व भार्गवीय कथासमूह फारसा जुना नाही. तो उत्तरकालीन, बहुतेक चौथ्या-पाचव्या शतकानंतरचा पसारा आहे. जेव्हा आपण धड सोडून शिराची, फक्त मुखवटयांची म्हणजे तांदळयाची पूजा करतो, (उदाहरणार्थ, माहूरची रेणुका) त्या वेळी आपण देवीची पूजा करीत नसून, घटाची