पान:परिचय (Parichay).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग । १९
 

 या परिवर्तनक्रमात आपण तेराव्या शतकात म्हणजे, ज्ञानेश्वरांच्या काळी येतो. या कालखंडात भोवतालचे वातावरण कसे आहे ? प्रथम म्हणजे वैदिकांचे यज्ञप्रधान कर्मकांड आहे. बौद्ध परंपरा आधीच लुप्त झालेल्या होत्या. जैनही फारसे प्रभावी राहिलेले नव्हते. पण शैव, वैष्णव, शाक्त इत्यादींच्या तंत्रसाधना व त्यांचे वामाचार, अभिचार आहेत. ते समाजात खूपच प्रभावी आहेत. परमार्थसाधना म्हणूनच चालणारे व्यभिचारांचे अड्डे आहेत. आणि तिसरे म्हणजे भक्तिमार्ग व त्याचे नव्याने वैभवात आलेले देऊळ व पूजाप्रधान कर्मकांड हेही आहे. या तीन प्रमुख गटांच्यामध्ये एकमेकांचे विचारही खूप मिसळलेले आहेत. वैष्णवांची मधुराभक्ती म्हणजे आशयतः तंत्रमार्ग, पण तो भक्तीच्या मखरात बसविलेला दिसतो. देऊळप्रधान पूजेचे कर्मकांड म्हणजे पुन्हा वरिष्ठ वर्गाने मनोरंजनासह सर्व सोयी भक्तीच्या नावे संग्रहित केलेल्या. अशी विविध मिश्रणे आहेत. त्यांचा पुरेसा परामर्ष गाडगीळांनी घेतलेला आहे.
 भक्तिमार्गात सारे महत्त्व परमेश्वराला. भक्ताचे काम त्याचे गुणवर्णन करणे व सेवादास्य करणे, ईश्वराच्या कृपेची वाट पाहत बसणे. तंत्राच्या आहारी जाऊन समाजाचा -हास होतो हे जितके खरे आहे तितकेच देव व देऊळ यांवर होणारे प्रचंड खर्च, तिथे फुकट जगणारे लोक व ईश्वरावर भार टाकून कर्तव्य सोडून बसणारे लाखो भाविक हा अपव्ययच असतो. समाजाचा त्यातील कर्तृत्वशक्तीचा ऱ्हासच असतो, हेही खरे आहे. म्हणून संत ज्ञानेश्वरांचे मोठेपण केवळ भक्तिमार्गी असण्यात नाही; तर एकीकडे यज्ञ-तंत्र-देऊळप्रधान सेवादास्य यांच्याविरुद्ध जीवनाचे शुद्धीकरण प्रतिपादन करणारी जनतेची आंदोलने निर्माण करण्यात आहे आणि दुसरीकडे भक्तियोग ही कल्पनाच नव्याने मांडण्यात आहे. ज्ञानेश्वरांच्या भक्तियोगात जीवनाचे शुद्धीकरण आहे. कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाचा विरोध आहे. त्याचप्रमाणे लोकसंग्रहार्थ कर्तव्यकर्माची जबाबदारीही आहे. ज्ञानेश्वरप्रणीत भक्तिमार्ग हा इतर सर्व भक्तिमार्गापेक्षा निराळा आहे.

 डॉ. गाडगीळांच्या या विवेचनाला मी फक्त एक पुरवणी जोड इच्छितो. ज्ञानेश्वरांना काय हवे होते, त्यांच्या समकालीन वारकरी संतांनी कोणते कार्य केले हे सारे गाडगीळांचे विवेचन मला मान्य आहे. पण पहिली दोन-तीन शतके गेल्यानंतर शिल्लक काय राहिले ? सर्व भारतभर विशिष्टाद्वैती, शुद्धाद्वैती, द्वैती व भेदाभेदवादी भक्तिमार्ग जसेच्या तसे राहिले. ज्ञानेश्वर आणि कबीर त्यांच्यावर मात करू शकले नाहीत आणि महाराष्ट्रात ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी अतिपूज्य असली तरी व्यवहारात ईश्वरसेवा हाच भक्तीचा आदर्श राहिला. ज्ञानेश्वर फारसा रुजला नाही, फक्त पूज्य ठरला एवढाच ह्याचा अर्थ आहे.