पान:परिचय (Parichay).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८ । परिचय
 

आर्यांच्या टोळ्यांत जन्माला यावयाला काय हरकत आहे ? वैदिकांची मध्यवर्ती कल्पना यज्ञ. तिच्यातून भक्तिमार्गाचा उदय अशक्य हे जितके खरे तितकेच आर्येतरांच्या यातुविधीतूनही भक्तिमार्गाचा उदय अशक्य आहे हे खरे नाही का ? वैदिक आर्य असोत की समकालीन आर्येतर असोत, त्यांच्या मध्यवर्ती विचारधारा, त्यांचे मध्यवर्ती प्रधानविधी व आचार भक्ती या कल्पनेशी विसंगत आहेत. मग भक्तिमार्गाचा उगम अवैदिकच म्हणण्याचे कारण काय ?
 याची कारणे दोन आहेत. एकतर भक्तिमार्गात ज्या देवतांना महत्त्व आले त्या, वैदिकांच्या गौण देवता आहेत. त्यांतील विष्णू आणि शिवलिंग देव आहेत आणि पुढे पुराणात सतत या देवांशी स्पर्धा करून इंद्र पराभूत झाल्याची वर्णने आहेत. भक्तिमार्गातील प्रमुख देवता ह्या वैदिकांच्या प्रमुख देवतांच्या विरोधक, त्यांना पराभूत करणाऱ्या आणि वैदिकांनी लौकर मान्य न केलेल्या आहेत. दुसरे म्हणजे भक्तिमार्ग हा नेहमीच यज्ञप्रधान कर्मकांडाविरुद्ध, सामान्य जनतेचा उठाव या स्वरूपात वावरला, विकसित झाला. या दोन कारणांच्यामुळे अवैदिक परिघात जन्माला येऊन, नंतर वैदिकांच्या समूहात घुसलेली व शेवटी वैदिकांच्या मूळ भूमिकेवर मात करणारी कल्पना म्हणूनच भक्तिमार्गाकडे पाहिले पाहिजे.
 या संदर्भात गाडगीळांनी जे विवेचन केले आहे त्यावर माझे दोन आक्षेप आहेत. प्रथम म्हणजे या कल्पना अवैदिक आहेत ही नोंद पुरेशी नाही. क्रमाने संस्कृतिसमन्वयाच्या प्रक्रियेत या कल्पना वैदिक वाङमयातच प्रभावी होत जातात व यज्ञाचे सामाजिक महत्त्व समाप्त करतात, यांचाही आढावा हवा. डॉ. गाडगीळांच्या विवेचनात दुसरा भाग प्रभावी होत नाही. पण दुसरा याहूनही महत्त्वाचा आक्षेप म्हणजे प्राचीन मानवी समूहांच्यासमोर असणारे मुख्य प्रश्न दोन. अन्न आणि रक्षण या दोन गरजांच्या भोवती वैदिकांचे व आर्येतरांचे यातुविधी निर्माण होतात. या समूहांना जग निर्माण करणारा, कृपा करणारा देव का लागतो; यातुविधीबाहेर का जावे लागते; समाजजीवनाच्या कोणत्या अवस्थेतून, कोणत्या गरजेतून विश्वपालक व नियंता जन्माला येतो; याचा फारसा तपशिलाने विचार करण्याची गरज डॉ. स. रा. गाडगीळांना वाटलेली नाही. पितृसत्ताक समूहात शेतीचा पुरेसा विकास झाल्यानंतरच ह्या सर्वसाक्षी देवाचा उदय होतो, अशी माझी समजूत आहे.

 वैदिक यज्ञ, अवैदिक तंत्र आणि भक्तिमार्ग यांचा आपापसात सतत संघर्ष चालू असलेला दिसतो. बौद्ध आणि जैन हे वैदिक यज्ञाविरोधी बंड करणारे प्रमुख गट असे आपण मानतो. पण पूर्वमीमांसेखेरीज असणाऱ्या वैदिक दर्शनांच्या परंपरा व चार्वाक आणि इतर तंत्रसाधक संप्रदाय, भक्तिमार्गी हेही यज्ञविरोधी राहिले. मुळचा यज्ञच क्रमाने बदलत नामजपयज्ञ या कल्पनेपर्यंत बदलला.