पान:परिचय (Parichay).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६ । परिचय
 

 वैदिक आर्यांच्या शेजारी अवैदिक आर्येतरांचे मानवसमूह आहेत. त्यांचेही जीवन यातुप्रधानच आहे. यज्ञप्रधान आर्यांच्यापेक्षा या आर्येतरांचे विधी निराळे त्यांच्या कल्पना निराळ्या पण त्यांच्यातही लौकर व सहज लय न पावणाऱ्या श्रद्धा आणि विधी आहेतच. या आर्येतरांच्यासमोरही अन्न, पाऊस, संतती, पशुधन इत्यादी प्रश्न आहेतच. त्यांच्या प्राप्तीसाठी त्यांचेही यातुविधी आहेतच. हे व अशा प्रकारचे विधी जगभरच्या आदिम मानवसमूहात आहेत. यज्ञामुळे पाऊस पडतो ही आर्यांची श्रद्धा, तर पावसाशी निगडित पर्जननृत्य केले म्हणजे पाऊस पडतो ही आर्येतरांची श्रद्धा. या आर्येतरांच्या यातुकल्पनेत स्त्रीला फार मोठे महत्त्व आहे. सर्व निर्मिती स्त्री करते; समूहातील सर्व स्त्रीपुरुषांनी मुक्त उपभोग शेतात जाऊन घ्यावा, त्यामुळे जमिनीत बीजशक्ती वाढते, उत्पादन वाढते, अन्न वाढते; अशा आर्येतरांच्या श्रद्धा आहेत. हा मुद्दा समोर ठेवून आर्येतरांचे अनेक विधी व सण आहेत. त्यांच्या मातृदेवता आहेत. या आर्येतरांच्यापैकी अनेक समूह मातृसत्ताक आहेत. जे मातृसत्ताक समूह नाहीत तिथेही मातृपरंपरा खूप प्रभावी आहेत. आर्येतरांच्या या यातुविधीत व श्रद्धांच्यामध्ये तंत्राचा उगम आहे, असे गाडगीळांचे म्हणणे आहे. अधिक नेमकेपणाने त्यांचे म्हणणे असे की, समाज एक अवस्था ओलांडून पुढे गेला. नंतर या श्रद्धा व विधींना सामाजिक अस्तित्व 'टिकविण्याचा व जगविण्याचा' अर्थ उरला नाही, पण याहीनंतर हे विधी मात्र टिकून राहिले. धर्माच्या नावाखाली या विधींना आत्मसात करून टिकविण्याचे काम तंत्रमार्गाने केले.
 तंत्राचा उगम व तंत्राचे मूळ आर्येतरांचे यातुविधी व श्रद्धा यांमध्ये आहे हे गाडगीळ यांचे मत मला पटते. पण तंत्रसाधनेचे इतकेच स्पष्टीकरण करणे अपुरे आहे, असे मला वाटते. आपण जर स्थूलमानाने इ. स. पू. २००० ह्या ठिकाणी रेघ मारली तर त्या आधीच्या काळात आर्यांचा वैदिक यातुविधी यज्ञ आहे. आर्येतरांचा स्वतंत्र यातुविधींचा पसारा आहे. दोन्ही समूहांच्या समोर अन्न हा प्रमुख प्रश्न आहे. या काळाच्या आपण कितीतरी पुढे येतो. इसवीसनाच्या आरंभाजवळ येतो. आणि तंत्रसाधनेच्या खाणाखुणा दिसू लागतात. तंत्र धर्मजीवनात प्रभावी ठरू लागते. भारताच्या सर्वांगीण जीवनऱ्हासाचा व तंत्राच्या वैभवाचा काळ स्थूलमानाने इ. स. च्या आठव्या-नवव्या शतकापासून सुरू होतो. सर्व समाजभर पसरलेले यातुविधी सार्वत्रिक असूनही फक्त जीवन टिकविणारे, समाजाचा आधार म्हणून राहतात, हा एक काळ आहे इ. स. दोन हजार पूर्वीचा, आणि तेच आचार समाजाच्या सर्वांगीण ऱ्हासात सहभागी होतात हा दुसरा काळ आहे इ. स. ८०० नंतरचा. या दोन कालखंडांच्या मध्ये दोन हजारांहून अधिक वर्षे जातात, इतकेच सत्य नाही, तर भारताच्या सर्वांगीण वैभवाचा सुवर्णकाळही येऊन जातो. ज्या