पान:परिचय (Parichay).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२ । परिचय
 

तर्कतीर्थ हे कबूल करणार नाहीत, पण गाडगीळांच्या विरोधी बाजू घेताना ते वेदऋचांचे स्पष्टीकरण पौराणिक पद्धतीने करीत आहेत.
 आपला श्रद्धापूर्ण अभिमान हे विवाद्यता वाढण्याचे दुसरे कारण आहे. जगभर आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास करून गोळा करण्यात आलेला पुरावा आणि भारतभरच्या आदिवासींच्या चालीरीतींशी असणारे त्या पुराव्याचे आश्चर्यकारक साम्य मान्य करणे आणि भारतातील गणतंत्रे, मातृसत्ता व इतर मातृनिष्ठ परंपरा यांबाबत कोणतेही विवेचन करणे आमच्या अहंतेच्या विरोधी जाते. शिव हा मुळात लिंगदेव आहे हे तर खरेच आहे; पण विष्णू हाही 'शिपीविष्ठ ' असल्यामुळे व ब्रह्मदेव प्रजापती, विधाता असल्यामुळे मुळात लिंगदेवच आहेत हेही तितकेच खरे आहे. लिंगपूजेच्या अतिप्राचीन परंपरेच्या विकासातून आमची पूज्य त्रिमूर्ती क्रमाने उदय पावते, विकसित होते, हे मान्य करणे फार कठीण जाते. देवीपूजेच्या मुळाशी असणाऱ्या योनिपूजेच्या परंपराही अशा मानवत नाहीत. चिकित्सा अशा प्रकारे अहंतेच्या विरोधी जाऊ लागली म्हणजे अहंता व परंपरा यांच्या समर्थनासाठी जोरदार युक्तिवाद पुढे येऊ लागतात. चर्चा न करता फक्त गप्प बसून उपेक्षा करणे हा तर परंपरा-समर्थकांचा फारच मोठा उपाय आहे.
 धर्म, विचार, विधी, श्रद्धा यांचा समाजजीवनाशी असणारा सांधा स्पष्ट करणे हे आपणांस रुचतच नाही. गाडगीळ कर्मठ मार्क्सवादी नसले तरी संयमशील मार्क्सवादीच आहेत. त्यांच्या मानसिक प्रक्रियेमागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्क्स उभा असतोच. ह्या साऱ्या कारणांमुळे गाडगीळांच्या विवेचनात विवाद्यता भरपूर आहे आणि म्हणूनच त्यांच्या विवेचनाचा तपशिलाने विचार करायला हवा असे मला वाटते.
 एका अतिशय महत्त्वाच्या पण लक्षात घेतल्या न जाणाऱ्या प्रश्नापासून हा विचार आपण करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला वेदमंत्रांनी युक्त असा अभिषेक गागाभट्टांकडून इ. स. १६७४ ला करून घेतला हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. आपण असे विचारू शकतो की, शेवटी शिवाजी वर्णाश्रमधर्माला शरण जाणारा व राजेशाहीचा पुरस्कर्ताच होता की नाही ? मग आजच्या पुरोगामी युगात फार तर शिवाजीला आपण प्रतिगामी धर्माचा उपासक पण दयाळू हुकुमशहा म्हणू. याहून अधिक मोठेपण या माणसाचे काय म्हणून मान्य करावे ? डाव्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या काही पंडितांनी 'धैर्याने ' हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. माझा प्रश्न असा आहे की, हा प्रश्न उपस्थित करणे शास्त्रीय आहे का ? मार्क्सवादाशी तरी हा प्रश्न सुसंगत आहे का ? आणि माझे उत्तर असे आहे की, प्रश्नच मूलतः चुकीचा आहे. भारतात नवे शिक्षण, रेल्वे, मुद्रणकला, यंत्रोद्योग या साऱ्या बाबींचा आरंभच क्रमाने १९ व्या शतकात होतो.