पान:परिचय (Parichay).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८५७ च्या वीर महिला । ११९

जनतेत संस्थानिकांच्या विषयी आदर असतो. त्याची कारणे मध्ययुगीन श्रद्धांत आहेत. बस्तरची जनता, बस्तरच्या महाराजामागे बहुसंख्येने उभी आहे; म्हणून तिला घटनाद्रोही म्हणणे तितके असमंजसपणाचे होईल; तितकेच हजरतमहलच्या मागे उभी असणारी अयोध्येची जनता राष्ट्रप्रेमी होती हे म्हणणेसुद्धा असमंजसपणाचे होईल.
 एका बाबतीत मात्र देशपांड्यांची स्तुती करणे आवश्यक आहे. ती बाब म्हणजे केवळ कर्तृत्व या दृष्टीने पाहिले तर ज्या स्त्रियांनी हा लढा लढला त्यांचे कर्तृत्व तर मान्य करावेच लागेल; पण ज्यांनी आपल्या भागात उठावच होऊ दिला नाही, होऊ घातलेला उठाव आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर दडपून टाकला अगर ज्यांनी लढताना शक्य ती अंधारातून मदत केली व बाजी बदलताच सर्वात आधी शरण जाऊन माफी मिळवली त्यांचेही कर्तृत्व मान्य करावे लागेल. हे देशपांड्यांनी मार्मिकपणे ओळखलेले आहे. या दृष्टीने नागपूरकर भोसल्यांची बाकाबाई व अहिरीची गौंड राणी लक्ष्मीबाई हयांचे चरित्र या पुस्तकात त्यांनी दाखल केले आहे. मांडणी करताना देशपांडे कधी कधी चांगल्याच गमती करतात. त्यांतील निदान काही तरी नोंदविल्या पाहिजेतच. एक म्हणजे एखाद्या वीर रमणीचे चरित्र सांगताना ते इतर कुठला पुरावा मिळत नसेल तर पंडित सुंदरलाल अगर सावरकर यांची विधानेच पुरावा म्हणून वापरतात. ही इतिहास सांगण्याची पद्धती नव्हे. अझीझनचे सगळे चरित्र अशा प्रकारचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रीने १८५७ साली काहीही भाग घेतल्याचे नमूद नाही; इतकेच नव्हे, तर जिने भाग घेतला असा फारसा संशयही कुणाला आलेला दिसत नाही अशा व्यक्तींच्या संबंधाने काही तुरळक संशय व्यक्त झालेले असतात. तुरळकपणे असा एखादा उल्लेख येतो. एखादा साक्षीदार हवालदार बालमुकुंद असे सांगतो की, अमक अमुक ऐकण्यात आले होते. इतक्या आधारे देशपांडे ती व्यक्ती देशप्रेमी ठरवतात. असा प्रकार ग्वाल्हेरची बायजाबाई आणि कोल्हापूरची ताईबाई हयांच्या बाबत झालेला आहे, कुठल्या तरी एका गीतात कुणी तरी एक स्त्री आपल्या प्रियकराची कुचेष्टा करते. ती म्हणते, माझ्या प्रियकराला लूटही करता येत नाही 'आवरोने लुटे शाले दुशाले । मेरे प्यारे ने लूटे रुमाल.' देशपांडे यांनी हे गीत सत्तावन्न साली स्त्रीवर्ग किती देशप्रेमी झाला होता याचा पुरावा म्हणून उद्धृत केले आहे. असो.
 सदर पुस्तकाला कु. मालती जोशी यांची अतिकृत्रिम अशी प्रस्तावना आहे; ज्या प्रस्तावनेत निरर्थक विशेषणांची खैरात केली आहे. अशा प्रकारे खैरात करून एखाद्या पुस्तकाची स्तुती होत असते असे वाटत नाही. मालती जोशी यांच्या मते या ग्रंथांत खोल व चतुरस्र व्यासंग, स्वतंत्र विचारसरणी, व्युत्पन्नता ह्यांचा परस्पर