पान:परिचय (Parichay).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८। परिचय
 

दुसरा मार्ग, त्या वेळी त्या शूर स्त्रीने दुसरा मार्ग स्वीकारला व तिने इथून पुढे अतिशय शौर्याने लढाई दिली. मृत्यू पत्करला. असा इतिहास आहे. तेव्हा शेवटच्या हौतात्म्यामुळे त्यांच्या जीवनाच्या एकूण ग्रंथाला झळाळी आलेली आहे, ही गोष्ट उघड आहे. मी स्वतः शेवटच्या क्षणी दाखविण्यात आलेले शौर्य गौण असते असे मानणारा नाही. व्यवहाराच्या पातळीवर सामान्यांच्यासारखी जगणारी माणसे असामान्य क्षणी तापलेल्या सुवर्णाप्रमाणे उजळून उठतात हा सर्व स्वातंत्र्यलढयाचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही जिचा गौरव करतो ती राणी आपल्या नव्या रूपात शेवटचे किती महिने होती हा प्रश्न गौण असतो. हुतात्म्यांचा भूतकाळ पाहत नसतात. ज्या दिव्य कालखंडाने त्यांचे जीवन पवित्र होते तेवढाच पाहण्याजोगा असतो. पण सत्य म्हणून जेव्हा विचार करू तेव्हा सारे चित्र डोळ्यांसमोर असले पाहिजे. हीच गोष्ट बहादुरशाहाची लाडकी राणी झीनत महल हिची आहे. तिचा सर्व प्रयत्न आपला मुलगा जवानबख्त याला गादी मिळावी हा होता. त्या दृष्टीने तिची कारस्थाने चालू होती. फखरुद्दीन याच्या मृत्यूच्या प्रकरणी तिच्यावर विष दिल्याचा संशय होताच. बादशाहने फौजेच्या खर्चासाठी खटपटीने मिळविलेला पैसा झीनत महलने मधल्यामध्ये गडप केला, असा शिपायांचा तिच्यावर आरोप होता. शेवटच्या क्षणापर्यंत इंग्रजांशी तह करून पाहण्याची तिची धडपड चालूच होती. हेच हजरतमहल हिच्याविषयी म्हणता येईल. फार तर हजरत महलने झीनत महलप्रमाणे आपला जीव वाचावा यासाठी काही लाख रुपये देण्याचा प्रयत्न केला नव्हता, असे म्हणता येईल. हजरत महल ही एक सामान्य नर्तकी. स्त्रैण वाजतअलीशहाने तिला आपली बेगम केले. ही कर्तृत्ववान स्त्री आपला मुलगा बिर्जीशकद याला गादीवर बसवून अयोध्येच्या प्रचंड उठावाची सूत्रधार झाली. अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा तिने शिपायांना जी धमकी दिली, तिच्यावरून तिच्या मनोवृत्तीवर प्रकाश पडतो. ती म्हणाली, 'जर शिपाई प्राणपणाने लढणार नसतील; तर आपण इंग्रजांकडे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी बोलणी सुरू करू.' तिच्या जाहीरनाम्याचासुद्धा मुख्य रोख माझे संस्थान परत मिळेल काय हा आहे. खरी गंमत तर ही आहे की, इंग्रजांचा आपल्या शक्तीवर प्रचंड विश्वास होता. ते चिवट होते. ढासळणाऱ्या बुरुजांचे हे दगड ढासळून पडावेत हीच त्यांचीही इच्छा होती. त्यांनी ठिकठिकाणी संस्थानिकांच्या माफीनाम्याच्या अटी फेटाळल्या. हे संस्थानिक स्वातंत्र्य मागत नव्हते. इंग्रजांच्या दयाळ पंखाखाली आपला तनखा, मानमरातब वंशपरंपरा अबाधित राहावा इतकीच त्यांची इच्छा होती. पण इंग्रजांना या निमित्ताने जितकी संस्थाने संपतील तितकी हवी होती. इंग्रज तहाला तयार नव्हता. माफी द्यावयाला तयार नव्हता. आमचे क्रांतिवीर मरेपर्यंत लढले, लढताना मेले, याचे हे एक महत्त्वाचे कारण होय. ही वस्तुस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहण्याइतके धैर्य आपणाजवळ पाहिजे. मागासलेल्या