पान:परिचय (Parichay).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८५७ च्या वीर महिला । ११७

 इतिहास म्हणून पाहिले तर पुष्कळसा भ्रमनिरास होऊन जातो. या तीन महिला म्हणजे बेगम झीनत महल, बेगम हजरत महल आणि राणी लक्ष्मीबाई. पैकी झाशीपुरते बोलावयाचे तर पहिल्या बाजीरावने छत्रसालाला जी मदत केली त्याबद्दल छत्रसालाकडून बाजीरावाला बुंदेलखंड मिळाला. या बुंदेलखंडात त्या वेळी नेवाळकर घराण्याला मिळालेली जहागीर म्हणजे झाशी. इ. स. १८३५ साली या घराण्याचा अधिपती रामचंद्रराव याला, संस्थानाने इंग्रजांना दर वेळी जी मदत केली तिचा मोबदला म्हणून, 'महाराजाधिराज फिदवी बादशहा-जमाइंग्लिश्तान' ही पदवी मिळाली व झाशी हे संस्थान झाले. लक्ष्मीबाईंचा पती गंगाधरराव हा इंग्रजांच्या मेहरबानीने संस्थानाधिपती झालेला होता. १८४३ साली गंगाधररावला राजेपदाचे हक्क मिळाले. याची दूसरी बायको म्हणजे राणी लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाईंचे वय ५८ साली त्यांच्या मृत्यूच्या सुमारास फार तर २३-२४ वर्षांचे होते. लग्नसमयी त्यांचे वय ११-१२ वर्षांचे होते हे गृहीत धरले म्हणजे ' संसार'या शब्दाला या स्त्रीच्या जीवनात काय अर्थ असावा ही बाब वादग्रस्त होते. १८५३ साली गंगाधरराव वारला. त्यानंतर लक्ष्मीबाईने आपला दत्तक पुत्र दामोदर याला झाशीचा वारसा मिळावा यासाठी कसून प्रयत्न केला. ह्या प्रसंगीचा तिचा मुख्य मुद्दा वंशपरंपरेने आपले संस्थान इंग्रजांशी किती एकनिष्ठ राहिले, किती प्रेमाचे संबंध आपापसात राहत आले यावर बोट ठेवणे हा होता. १८५४ साली राणीला ६० हजारांचा तनखा मंजूर करून संस्थान खालसा करण्यात आले. त्या वेळी तिने मुकाटयाने किल्ला रिकामा केला व गावात राहणे पत्करले. असे सांगतात की, त्या वेळी ती म्हणाली, “ मेरी झाशी मै कभी नहीं दूंगी," तिचे हे उद्गार तिचीच पूढची वागणूक फोल ठरवतात. सत्तावन्न सालापर्यंत गडबड न करता अर्ज, विनंत्या, तक्रारी या चक्रात ती फिरत होती. प्रथम तिने पेन्शन नाकारले. पुढे नाइलाज म्हणून स्वीकारले. सत्तावन्न साली ६ जूनला झाशीला उठाव झाला. हा उठाव झाल्यानंतर लक्ष्मीबाई हिने झाशीचा कारभार ताब्यात घेतला व शिपाई दिल्लीला चालते झाले. बाईने या घटनेसंबंधी इंग्रजांच्याकडे स्पष्टीकरण दिले. यानंतर कमिशनरच्या हुकमान्वये ती इंग्रजांच्या वतीने झाशीची कारभारीण बनली. फेब्रुवारी अठ्ठावन्नपर्यंत झाशीच्या राणीने इंग्रजांच्या संबंधी मित्रत्वाचे धोरण बदलले नव्हते, असे मानण्यास जागा आहे. मार्चमध्ये इंग्रजी फौजा झाशीकडे कूच करून निघाल्यानंतरसुद्धा लक्ष्मीबाईने फिरोजला आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. आणि शेवटी ज्या वेळी तिच्यासमोर निश्चित स्वरूपात अशी वस्तुस्थिती उभी राहिली की, झाशी संस्थान परत मिळणार नाही, इंग्रजांचा आपल्यावर विश्वास नाही, इंग्रजांना शरण जाऊन मानहानिकारक जिणे जगावे अगर फासावर चढावे हा एक मार्ग; किंवा लढून विजय प्रस्थापित करावा अगर हौतात्म्य पत्करावे हा