पान:परिचय (Parichay).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६ । परिचय
 

दाखविलेली मुत्सद्देगिरी, पराक्रम, देशभक्ती ही खरोखरच मन थक्क करून टाकणारी आहे. स्थूलमानाने देशपांडे यांचे प्रतिपाद्य मान्य करण्यास हरकत नाही. तपशिलात शिरण्याचा प्रयत्न करताना मात्र या प्रतिपादनातील अनेक कच्चे दुवे उघडकीला आल्याशिवाय राहत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या संपूर्ण इतिहासात लढवय्या, कर्तबगार, मुत्सद्दी अशा स्त्रिया तुरळक का होईना पण आढळत आलेल्या आहेत. पेशवाईचे उदाहरण जरी घेतले तरी गोपिकाबाई, आनंदीबाई, अहिल्याबाई होळकर इ. नावे; त्या आधीची जिजाबाई, येसूबाई, ताराबाई इ. मराठेशाहीतील नावे; त्या आधीची बेगम नूरजहान, चांदबिबी, रोशन आरा इ. नावे; त्याही आधीची राणी कर्णावतीसारखी स्त्रीरत्ने नोंदविता येतील. अगदी अशोकाच्या काळी गेले तरी अशोकाच्या पत्नींपैकी तिश्शरक्षितेच्या आख्यायिका बुद्ध वाङमयात आहेत. पण अशा तुरळक उदाहरणांनी काहीही सिद्ध होणार नाही. नाव घेण्याजोग्या व्यक्तिमत्त्वाच्या दोनच महिला सत्तावन्न साली चमकल्या आहेत. पैकी एक म्हणजे अयोध्येची बेगम हजरात महाल आणि दुसरी म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. उरलेल्या स्त्रियांचे कर्तृत्व पुष्कळसे असे आहे की, ज्यांचा संबंध देशनिष्ठेपेक्षा इतर बाबींशी अधिक येईल. सामान्यपणे आजही ज्या प्रदेशात लुटारूंचे प्रस्थ आहे तिथे त्यांच्या बायका पिछाडी सांभाळताना आढळतात. केवळ सत्य म्हणून पाहिले म्हणजे ज्या संग्रामात लढणाऱ्या पुरुषांच्या व पुरुषनेत्यांच्या देशनिष्ठेविषयी खात्री वाटत नाही, तिथे धारातीर्थी पडलेल्या महिला केवळ धारातीर्थी पडल्या म्हणून स्वातंत्र्यवादिनी होत्या हे म्हणणे काहीसे अतिरंजित वाटते. उठाव करणाऱ्या शिपायांनी ज्या बहादुरशाहला भारताचा सम्राट घोपित केले तो शिपायांना सतत कंटाळलेला होता आणि सारखा इंग्रजांशी हातमिळवणी करण्याच्या उद्योगात गढलेला होता व ज्या नानासाहेबाच्या नावे पेशवाई घोषित केलेली होती त्याला सक्तीने शिपायांनी उठावात भाग घ्यावयाला लावले होते व तोही सारखा माफीचे आश्वासन मिळविण्याच्या प्रयत्नात होता, ही कट ऐतिहासिक सत्ये आहेत. इंग्रजांच्या विषयी प्रक्षुब्ध होऊन जगण्या-मरण्याची लढाई खेळावयाला तयार झालेल्या जनतेला त्यांच्या मध्ययुगीन श्रद्धेप्रमाणे मोगलसम्राट आणि पेशवे नेते म्हणून हवे होते. आणि या नेत्यांना जमले तर स्वातंत्र्य, न जमले तर माफी हवी होती. अशी ही रस्सीखेच आहे. ढासळत चाललेल्या बुरजाचे दगडगोटे वर चढण्यासाठी शिपायांनी दर वेळी दोन्ही हातांनी धरण्याचा प्रयत्न केला. उभयपक्षी असणाऱ्या स्वार्थानी दोघेही एकमेकाला कंटाळलेले होते; व भीती त्यांना एकत्र सांधीत होती. केवळ भावना आंधळी असते. तिला अधूनमधून विचारांची जोड द्यावी लागते.
 स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वश्रेष्ठ अशा ज्या तीन महिला, त्यांचे जीवन केवळ