पान:परिचय (Parichay).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२ । परिचय
 

याचा शिवाजीच्या कर्नाटक दिग्विजयाशी अर्थाअर्थी संबंध नाही. आपल्या कर्नाटकातील जहागिरीत विद्या व कला यांना आश्रय देण्याची परंपरा शहाजीने सुरू केली. पुढे व्यंकोजी व सर्कोजी यांनी ती वाढविली. या परंपरेचा निर्माता शहाजी, संवर्धक व्यंकोजी आणि सर्कोजीने उपलब्ध साहित्याचा प्रचंड संग्रह केला. शिवाजी वजा जाता मराठेशाही व पेशवाई विद्या व कलेच्या आश्रयासाठी कधीच प्रसिद्ध नव्हती. आणि व्यंकोजीच्या मानाने शिवाजीचा आश्रय फार मर्यादित होता. झाले असेल तर इतकेच की, शिवाजी व व्यंकोजी यांच्या पराक्रमाने मराठ्यांच्या कर्नाटकस्थ राज्याची पूर्वतयारी झाली. शिवाजीने हे राज्य स्थापिले. शहाजीचा कर्नाटकात जहागीर स्थापन करण्याचा उद्योग राजारामाचे काळी मराठी राज्य जिवंत ठेवण्यास उपयोगी पडला. (१०) तत्कालीन खानदानीच्या मानाने भोसले घराणे बेताबेताचे मानण्यात येत असे; अशी शंका घेण्यास जागा आहे (पृ. २३५). शिवाजीचे विवाह ज्या घराण्यात झाले त्यापेक्षा मोठ्या तोलदारीची घराणी महाराष्ट्रात कोणती होती याचे सूचन झाल्याखेरीज या शंकेला जागा उरत नाही. शिवाजीच्या राज्यारोहणानंतर राजारामाची लग्ने झाली आहेत. ती क्रमाने गुजर, मोहिते, घाटगे, कागलकर या घराण्यांतील मुलींशी झाली. हीही घराणी फार मोठी म्हणता येत नाहीत. कदाचित राज्य स्थापन झाल्याच्यानंतर व शिवाजी छत्रपती झाल्याच्या नंतरसुद्धा त्याचे घराणे बेताबाताचे मानले जात असल्यास न कळे ! खरी गोष्ट अशी आहे की, शिवाजीच्या सोयऱ्यांत भोसल्यांइतके पराक्रमी घराणे नाही. पण सोयरे तर शहाण्णव कुळीत आहेत आणि शहाण्णव कुळीतसुद्धा त्या काळी फार मोठी घराणी दाखविता येत नाहीत. तेव्हा ही शंका निराधार आहे.
 असो. परीक्षण फार लांबले. चांगला ग्रंथ म्हटला की, असा विस्तार करावाच लागतो. प्रत्येक सुशिक्षित महाराष्ट्रीयाने एकवार अवश्य वाचावा इतका चांगला हा ग्रंथ आहे; यात शंका नाही. मतभेदाची स्थळे अनेक असली म्हणजे ग्रंथाची किंमत कमी होत नसते.


 (छत्रपती शिवाजी महाराज - ले. दि. वि. काळे. प्रकाशक : पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ)