पान:परिचय (Parichay).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपती शिवाजी महाराज । १११

माणूस पुन्हा हिंदू होऊन जवळ राहत असेल तर सन्मानाने जगण्याची संधी देण्याचे हे औदार्य इथे दिसून येते. शिवाय शत्रूकडील एक पराक्रमी माणूस कमी करण्याचा हिशेबीपणाही दिसून येतो.(५)शिवाजीच्या आग्यातील आगमनामुळे राजधानीतील शिळया संथपणाला कंटाळलेल्या लोकांना अगदी नव्या प्रकारचे खळबळजनक दृश्य पाहता आले (पृ. १६९). शिवाजीचे आग्रा येथून धाडसी पलायन खळबळजनक ठरले असल्यास नवल नाही. पण शिवाजी आला तेव्हा पराभूत व मांडलिक होता. म्हणून आग्रानिवासी जनतेला खळबळ वाटण्याचे काही कारण नाही. (६) शाहूला सोडून देताना औरंगजेबाने खाष्ट सावकाराप्रमाणे खंडणीची बाकी त्यावर काढली (पृ. १५१). आमची आजतागायतची समजूत औरंगजेब मेल्यानंतर व मेल्यामुळे शाहू सुटला अशी आहे. शाहआलमने शाहूची ब-हाणपूरला सुटका केली. त्या वेळी शाहआलम गादीचा वारस होण्याच्या प्रयत्नात होता. त्याला दिल्लीला जाऊन राजा व्हावयाचे होते. पैशाचा हिशोब करण्याच्या मनःस्थितीत तो नसला पाहिजे. (७) पावसाळा असतानाही दोन लहानसे हत्ती राज्यारोहणासाठी रायगडावर चढवण्यात आले (पृ. १९४). शिवाजीचे राज्यारोहण ६ जून १६७४ रोजी झाले. आपल्याकडे मृग ७ जूनला सुरू होतो. कदाचित त्या वर्षी एखाददुसरा पाऊस पडून गेला असेल, पण राज्यारोहणाच्यावेळी पावसाळा नक्की नव्हता. शिवाजीचे दुसरे राज्यारोहण २४ सप्टेंबरला झाले. त्याचा हेतू निश्चलपुरी या शाक्तपंडिताचे समाधान करणे हा होता. त्या काळच्या युगाप्रमाणे महाराजांवर थोडाबहुत शकुनांचा परिणाम होत असला पाहिजे. पहिला राज्याभिषेक ठरविला; तो बेत जमत आला इतक्यात १९ मार्चला महाराजांची एक पत्नी निवर्तली. महाराजांची मुंज २९ मे ला झाली. ३० मे ला उपलब्ध ४ राण्यांपैकी घरगुती अडचण आल्यामुळे त्यांना तिघींशीच लग्न करावे लागले. राज्यारोहणानंतर अवघ्या १७ दिवसांनी मातोश्री जिजाबाई मृत झाल्या. निश्चलपुरीच्या मते योग्य बलिदान झाले नाही. महाराजांनाही ते पटले असावे. पुन्हा राज्यारोहण २४ सप्टेंबर रोजी झाले. हे राज्यारोहण झाल्यानंतर लवकरच प्रतापगडच्या भवानीच्या देवळावर वीज पडली. असा इतिहास आहे. तेव्हा पृष्ठ १९६ वर काळे म्हणतात त्याप्रमाणे सर्वसाधारण लोकांचे पाठबळ मिळविणे हा दुसऱ्या राज्यारोहणाचा हेतू नव्हता. (८) महाराजांनी मद्रासच्या इंग्रजांच्याकडून १६७७ ला शोधपूर्वक विषाच्या उताऱ्यावरील औषधे मार्गावली. यावरून स्वतःला विषप्रयोग झालेला आहे अशी महाराजांनाही शंका होती असे दिसते (पृ. २०२). यावरून फक्त महाराजांना स्वतःला विष. प्रयोग होण्याची शंका होती इतकेच कळते. (९)तंजावरच्या राज्यात मराठीची छाप राहून विद्याकलांना उत्तेजन मिळाले याचे काही श्रेय महाराजांच्या दिग्विजयाला द्यावे लागेल (पृ. २१८). तंजावर येथील विद्या व कला यांचे संरक्षण व संवर्धन