पान:परिचय (Parichay).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११० । परिचय
 

रजपूत म्हणवतो व मराठी बखरकार त्याला सिसोदीया वंशाचा रजपूत मानतात तेव्हा ती अगदीच थाप नसून त्याला पुरेशा अस्सल पुराव्याचा आधार आहे. भोसले घराणे हे मूळचे रजपूत घराणे आहे हा समज शिवाजीच्या काळी सार्वत्रिक दिसतो. १६५६ इतक्या आधीच्या काळी शिवाजीचा 'ग्रेट राजपूत' असा उल्लेख करणारी इंग्रजी कागदपत्रे उपलब्ध आहेत. या सर्व प्रकरणाचा काळे यांनी अजिबात विचारच केलेला नाही. ही या ग्रंथाची एक महत्त्वाची उणीव मानली गेली पाहिजे.
 छोट्याछोट्या मुद्द्यांवर कुठे शैलीचे तर कुठे माहितीचे कच्चे दुवे या पुस्तकात विखुरलेले आहेत. एक तर ही ठिकाणे लेखकाच्या ढिसूळ शैलीची अगर चूक विवेचनाची समजली पाहिजेत किंवा ती लेखकाच्या गैर माहीतगारपणाची द्योतक मानली पाहिजेत. अशी या ग्रंथात सुमारे ५० स्थळे आढळतात. त्यांपैकी वेचक दहा इथे नोंदवतो. (१) उत्तरेतील हिंदूंप्रमाणे दक्षिणेतील हिंदू कर्मठ राहिलेले नव्हते. कारण परदेशाशी आलेला व्यापारी व अनेक प्रकारचा संबंध (पृ.६). महाराष्ट्रातील हिंदू लोक कर्मठ राहिलेले नव्हते हे खरे पण ते श्रेय ज्ञानेश्वर ते तुकाराम या संतांच्या चळवळीला दिले पाहिजे. (२) महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ च्या सुमाराला कल्याणभिवंडी घेतली. काळे लिहितात, 'औरंगजेब सिंहासन मिळविण्याच्या कारस्थानात गुंतलेला नसता तर हा उद्योग महाराजांच्या अंगाशीच आला असता.' (पृ. ६२). खरे म्हणजे शिवाजीची माहिती नेहमी अद्ययावत असे. आदिलशाह आजारी व अफजुलखान कर्नाटकात ही संधी साधून त्यांनी झपाटयाने जावळ खोरे जिंकले. औरंगजेब असा गुंतलेला होता म्हणूनच कल्याणभिवंडी घेतली नसता घेतलीच नसती. (३) शिवाजी शाईस्तेखानावर छापा घालण्यासाठी लालमहालात गेला, असे काळे यांना वाटते (पृ. १०५). सर्व समकालीन पुरावा व सभासदाची वखर, शिवाजी शाइस्तेखानाच्या डेऱ्यात गेला व हा डेरा लालमहालाच्या बाजूला होता' असे दर्शवतो. याच पृष्ठावर जसवंतसिंगाचे शेजारी असणारे दहा हजार सैन्य असूननसून सारखे झाले असा उल्लेख आहे. शिवाजीने जसवंतसिंग आधीच फितवून ठेवला होता असे मानण्यास जागा आहे.(४) मुसलमान झालेला नेताजी पालकर शिवाजीने हिंदू करून घेतला. यात शिवाजीचे नेताजीविषयी प्रेम दिसून येते, असे काळे यांचे मत आहे (पृ. १३६). शिवाजीने फलटणकरांनाही हिंदू करून घेतले आहे. सरसेनापती नेताजीला शिवाजीने हिंदू करून घेतले, जवळ बाळगले, पण पुन्हा त्याच्या दर्जाला शोभेसे मोठे काम मात्र दिले नाही. यात शिवाजीचा धोरणीपणा दिसून येतो, नेताजीबद्दलचे केवळ प्रेम नाही. त्याच नेताजीने एकदा कामात कुचराई केली तेव्हा त्याला कामावरून दूर करण्यात आले. त्याला पुन्हा महत्त्वाची जागा दिली नाही. पण एवढा पराक्रमी