पान:परिचय (Parichay).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपती शिवाजी महाराज । १०९

व्यसनी नव्हता. फौज त्याला अनुकूल होती व तो कर्तृत्ववान होता हे लक्षात घेता शिवाजीने संभाजी व मंत्रिमंडळ यांतील संघर्ष मिटविण्याची योजना केली नाही ही शिवाजीची चूक म्हटली पाहिजे. संभाजीला दोष देण्याचे कारण दिसत नाही. संभाजीच्या व्यसनीपणाचा पुकारा करणा-या या मराठी लेखकांना राजारामाविषयी जदुनाथ सरकार काय म्हणतात हे गावीही नसते. सरकारांच्या मते राजारामाच्या मंत्रिमंडळाने त्याला व्यसनी केले. प्रल्हाद निराजीने त्याला अफू, गांजा व विलासांत मग्न केले आणि स्वत: प्रल्हाद निराजी खराखुरा कारभारी झाला. (पहा- औरंगजेब हिंदी भाषांतर-ले. जदुनाथ सरकार). काळे यांनासुद्धा संभाजीकडे नीट पाहता आले नाही. हे संभाजीचे दुर्दैव म्हटले पाहिजे. राजारामाचा पक्षपाती सभासद संभाजीविषयी लिहिताना प्रमाण मानता येत नाही. काळे यांच्या ग्रंथातील दष्टिकोणात अशा काही गंभीर चुका आहेत; पण ही ठिकाणे फार थोडी. इतर सर्वत्र त्यांची विषयावर पकड घट्ट आहे.
 डॉ. बाळकृष्ण यांचा शिवाजी प्रकाशित झाल्यानंतर शिवाजीविषयी ग्रंथ लिहिणाऱ्या प्रत्येक लेखकावर शिवाजीच्या पूर्वजांचा विचार करण्याची जबाबदारी येऊन पडते. चितोडच्या रजपूत घराण्याचा राजा रावल कर्णसिंह याला दोन मुले. पैकी क्षेमसिंह चितोडचा वारस झाला, आणि राहप याने शिसोदिया घराण्यांची स्थापना केली. क्षेमसिंहाचा आठवा वंशज रत्नसिंह आणि राहपाचा दहावा वंशज लक्ष्मणसिंह इ. स. १३०३ च्या चितोडच्या स्वारीत सहभागी होते. लक्ष्मणसिंहाचा मुलगा अरिसिंह याचा मुलगा राणा हमीर याने चितोड परत जिंकले. अरिसिंहाचा धाकटा भाऊ अजयसिंह याची मुले सज्जनसिंह व क्षेमसिंह. हे दोघे भाऊ सन १३२० मध्ये दक्षिणेत आले. इ. स. १३५२ चे एक बहमनी फर्मान उपलब्ध आहे; ज्यात दिलीपसिंह पिता सज्जनसिंह पिता अजयसिंह यांचा उल्लेख आढळतो. या दिलीपसिंहाचा मुलगा सिधोजी. इ. स. १३९८ च्या एका फर्मानात भैरवसिंह पिता सिधोजी याचा उल्लेख आहे. इ. स. १४२४ च्या एका फर्मानात उग्रसेन पिता देवराज पिता भैरवसिंह याचा उल्लेख आहे. इ. स. १४७१ च्या एका फर्मानात भीमसिंह पिता कर्णसिंह पिता उग्रसेन याचा उल्लेख आहे. इ. स. १४९१ च्या आदिलशाही फर्मानात खेलोजी पिता भीमसिंह पिता कर्णसिंह याचा उल्लेख आहे. खेलोजी पुत्र मालोजी, पुत्र अक्षयसिंह, पुत्र कर्णसिंह, पुत्र चोलराज, पुत्र पिराजी, पुत्र प्रतापसिंह, पुत्र बाजी घोरपडे अशी वंशावळ फर्मानाच्या आधारे सिद्ध आहे. तेव्हा बाजी घोरपडे आणि सिसोदीया वंशाचा संबंध सिद्ध आहे असे म्हणण्यास हरकत नाही. १६३७ सालच्या वाटणीपत्राप्रमाणे शहाजी भोसले बाजी घोरपडे याचा भावकी मानला गेला आहे. म्हणजे शहाजी भोसले व सिसोदीया घराण्यातील रजपूत यांचा संबंध जोडणारी कागदपत्रे उपलब्ध आहेत. शिवाजी स्वतःला जेव्हा