पान:परिचय (Parichay).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४ । परिचय
 

या म्हणण्याला फारसा अर्थ नाही. शिवाजीने मोगलांचा लोंढा थोपविला, इतकेच खोटे नसून कुतूबशाही व आदिलशाही यांचा प्रदेशविस्तार थांबविला हेही म्हणणे बरोबर नाही. महाराष्ट्रात त्यांचा प्रदेशविस्तार थोपविला गेला असेल. अतिदक्षिणेकडे त्यांचे राज्य थोडे फार वाढत होते. मूळ म्हणजे शिवाजीने केवढे राज्य निर्माण केले हा मुद्दा फार गौण आहे.
 शिवाजीच्या राज्याला नाव काय द्यावे याचाही विचार काळ्यांनी केला आहे. 'हिंदवी स्वराज्य' हे नाव सन १६४५ इतक्या आधी शिवाजीने वापरले आहे. पण पुढे त्या नावाचा वापर आढळत नाही. इतकेच खरे नसून शिवाजीने हिंदुराज्य निर्मितीचा गंभीर प्रयत्न केला नाही हेही खरे आहे. उलट तो सर्वधर्म प्रतिपादनाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून होता. अखिल भारतभर राज्य निर्माण करण्याची त्याची जिद्द होती काय, याचे उत्तर 'होती' असे द्यावे लागेल. महाराष्ट्राबाहेर त्याने राज्य करण्याचा उपद्व्याप केलेला आहे आणि पुढे राजारामकाली मराठ्यांना अखिल भारतीय राज्याची स्वप्ने पडत होती, हे पुराव्याने सिद्ध आहे. उत्तरेतील हिंदूंच्यावर लादल्या गेलेल्या जिझीयाचा चिमटा शिवाजीला बसला हे जर सिद्ध असले, तर अखिल भारतीय राज्याचे स्वप्न त्याच्या डोळ्यांसमोर तरळत असले पाहिजे. ते साध्य झाले नाही हा प्रश्न अलाहिदा. काळे शिवाजीच्या राज्याला 'सह्याद्रीचे राज्य ' असे प्रदेशवाचक नाव देतात. प्रदेशवाचक अर्थाने ते नाव बरोबर आहे. पण भारतीय इतिहासात शिवाजीचे स्थान सांगण्यासाठी ते नाव अपूरे आहे. काळे म्हणतात, 'शिवाजी महाराज जीवनातील आनंद अनुभविणारे पुरोगामी नेते वाटतात.' हे शिफारसपत्र अनावश्यक आहे. कारण आपल्या परंपरेत जीवनातील आनंद अनुभवणे याला वेगळे अर्थ आहेत. ते म्हणतात, ' शिवाजी महाराजांनी सर्व जातींना राष्ट्रकार्याला जुंपून जातिभेदांतील द्वेषाचे विष मारून टाकले.' दुर्दैवाने इतिहास याच्या विरुद्ध आहे. ब्राह्मण, प्रभू आणि मराठा असे अधिकारी नेमले म्हणजे परस्परांना शह राहतो असे सभासदांनी म्हटले आहे. सरकार म्हणतात, हिंदू समाज जातिभेदांनी बनलेला आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाचा कोणताही प्रसंग प्रत्येक जातीत स्वतंत्र अस्मिता निर्माण करतो. जातीजातींच्या परस्परांना छेदणाऱ्या या अस्मिता एकूण समाज पुन्हा विस्कळीत करतात. दुर्दैवाने शिवाजीचे कार्य याला अपवाद ठरले अशी इतिहासाची साक्ष नाही. काळे म्हणतात, 'जिजाबाई, शहाजी, दादोजी कोंडदेव, दादाजी, नरसी प्रभू अनेक साधुसंत, राजगुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी इत्यादींनी शिवाजीच्या जीवनात तेजाची ठिणगी फुलवत ठेवण्यासाठी मनापासून कष्ट केले असले पाहिजेत.' हे वाक्य 'छिप्पा पाणी' खेळण्याच्या प्रकारातले आहे. त्यांनी पुराव्याने सिद्ध न होणारा रामदास-शिवाजीसंबंध मागच्या दाराने हळूच माजघरात आणला आहे. नसता