पान:परिचय (Parichay).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपती शिवाजी महाराज । १०३


आणि मत ठरवावे. पण शिवाजी जर दगेबाज ठरत असेल तर दगेबाजीचे समर्थन करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत बसू नये. दुर्दैवाने शिवाजीचे हे मोठेपण काळयांच्या मुठीतून निसटून गेले आहे आणि अवांतर भानगडींवर मूल्यमापनाच्या प्रकरणात त्यांनी भर दिला.
 शिवाजीच्या मोठेपणाचे मूल्यमापन, त्याच्या लष्करी आणि मुलकी कारभाराचे विवरण हा या ग्रंथाचा प्रमुख उद्देश नव्हे; आनुषंगिक उद्देश आहे. ही भूमिका मान्य करूनही जी दहा पाने या कार्यासाठी खर्चीली त्या दहा पानांत थोडक्यात हे मांडता येणे शक्य होते :- 'महाराजांची कामगिरी' या प्रकरणात त्यांनी शिवाजीच्या तोंडी सभासदाने घातलेल्या एका वाक्यापासून आरंभ केला आहे. ते म्हणजे, 'म्या शिवाजीने चाळीस हजार होनाचा पूणे महाल होता त्यावरा एक क्रोड होनाचे राज्य पैदा केले.' शिवाजीचे हे वचन खोटे नाही. पण फारसे महत्त्वाचेही नाही. कदाचित शिवाजीला त्याचा अभिमान वाटला असेल. आपल्या दृष्टीने त्यात फारसे महत्त्वाचे असे काही नाही. युद्धतंत्रविशारद सेनानी म्हणून शिवाजीची गणना जगातील फार मोठ्या सेनानींच्या तुलनेत निःसंशय कमी पडणार नाही अशी नकारात्मक मोठेपणाची अजून एक सूचना आहे. शिवाजीचा सेनानी म्हणून असलेला मोठेपणा वादातीत आहे. पण शिवाजीशी तुल्यबल सेनानी त्याआधी होऊन गेले आहेत. ज्यांना विपूल अनुकुलता होती त्यांच्याशी शिवाजीची तुलना करण्यात अर्थ नाही. केवळ युद्धतंत्र याचा विचार केला तर जवळ सुरतेवर झडप घालणाऱ्या शिवाजीपेक्षा दूर सोमनाथवर कोसळणाऱ्या गझनीची योग्यता कदाचित मोठी ठरेल. प्रतिकूल परिस्थितीत चिवटपणे राज्यरक्षणासाठी लढणारा सेनानी म्हणून मलिकंबर शिवाजीपेक्षा उणा पडणार नाही. हे लिहिण्याचा उद्देश सेनानी म्हणून शिवाजीचे असामान्यत्व अमान्य करणे हा नाही तर शिवाजीच्या राष्ट्रपुरुष म्हणून असणाऱ्या महात्मतेचा फार छोटा भाग युद्धतंत्रविशारदत्व आहे हे सांगण्याचा आहे.
 शिवाजीने मोगलसत्तेचा लोंढा थोपवून धरला, हा मुद्दा उघड चुकीचा आहे. कारण मोगलसत्तेचा लोंढा शिवाजीच्या काळात प्रथम कोसळला शाइस्तेखानाच्या द्वारे. शिवाजीने शाइस्तेखानाला शासन केले असेल. त्याने मोगलांचा फार मोठा पराभव कधीच केला नाही. दुसरा लोंढा जयसिंगाच्या रूपाने कोसळला. तो वीस वर्षांचे कार्य सपाट करून निघून गेला. तिसरा लोंढा खुद्द शाही नेतृत्वाखाली सन १६८१ मध्ये आला आणि दक्षिण पादाक्रांत करून निघून गेला. शिवाजीने अजिंक्य महाराष्ट्र निर्माण केला. तो जिंकण्यास मोगलांची सर्व शक्ती अपुरी पडली. महाराष्ट्र जिंकण्याच्या प्रयत्नात मोगल सत्ता खिळखिळी होऊन गेली व वेगाने नाशाकड़े घसरली, या म्हणण्याला अर्थ आहे. शिवाजीने मोगलांचा लोंढा थोपवून धरला,