पान:परिचय (Parichay).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२ । परिचय
 

जिद्दीने लढत होता. महाराष्ट्रात निर्माण झालेली ही जिद्द केवळ शिवाजी हिंदू होता या स्पष्टीकरणाने स्पष्ट होऊ शकत नाही. शिवाजीने निर्माण केलेले राज्य जनतेला प्राणपणाने टिकवण्याइतके मोलाचे वाटले, त्याने जागा केलेला आत्मविश्वास २५ वर्षे सततच्या धूळधाणीला पुरून उरला. शिवाजीचे मोठेपण त्याच्या या कर्तृत्वात आहे. वैभवहीन, नेतृत्वहीन, दरिद्री जनतेच्या मनात त्याने जो अजिंक्यपणाचा दुर्दम्य आशावाद निर्माण केला यात शिवाजीचे मोठेपण आहे, या दृष्टीने भारताच्या इतिहासात निदान ज्ञात इतिहासात शिवाजीला दुसरी तुलना नाही. हिंदू राजे चिवटपणाच्या बाबत कधीच प्रसिद्ध नव्हते. एखाददुसरा पराभव त्यांची मने मारून टाकीत असे. प्रतिकूल परिस्थितीला शरण जाऊन ते प्रामाणिक दास होत. शिवाजीने हिंदूंचा आणि सर्व भारतीयांचा इतिहास या मुद्द्यावर फिरविला. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला टिकणारे आणि योग्य काळ येताच पुन्हा उफाळणारे चिवट राजकारण त्याने जन्माला घातले. त्यात त्याचा मोठेपणा आहे. त्याच्या काळाच्या मानाने त्याने मुसलमानद्वेष्टे होणे शोभून गेले असते, पण मुसलमानांना औदार्याने आणि मानाने वागवून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. अकबराला धर्मसमन्वयवादी होणे भाग होते. कारण रजपूतांच्या तलवारी त्याचे राज्य वाढवीत होत्या, सुरक्षित करीत होत्या. तोडरमलची बुद्धिमत्ता स्थिर मोगल राजवटीचा पाया घालीत होती. शिवाय सर्वधर्मीसमानत्वाचा उपदेश अकबराला नुकसानकारक नव्हता. एक म्हणजे मुसलमान बाटवून हिंदू होत नाही. दुसरे म्हणजे हिंदूंना मुस्लिम छळाचा इतिहास नव्हता. या संदर्भात शिवाजीने ज्या औदार्याने अहिंदू प्रजेला वागविले त्या औदार्याला इ. स. ७१२ ते १८५७ या कालखंडात त्याला तुलना नाही. एतद्देशीय राजे नेहमी गाफील असत. शत्रूनी यांना धोके द्यावेत व यांनी शतकानुशतके धोके खावेत. शिवाजीने आपले जीवन या नियमाला अपवाद बनवले. शिवाय तो सर्वांगीण माणूस होता. चढाई आणि माघार, धाडस आणि सावधपणा, भूसेना आणि आरमार, किल्ले आणि त्याखालचा प्रदेश, मुलकी कारभार आणि लष्करी कारभार, धर्माभिमान आणि धार्मिक औदार्य या सर्वांचा अपूर्व आविष्कार त्याच्या रूपाने झालेला दिसून येतो. एतद्देशियांचा तो एकच असा राजा आहे की, ज्याने पराभवाचे तडाखे खात नसत्याचे असते केले. सतत झुंज घेत सिद्धाचे संरक्षण केले. राज्याबाहेर स्वतःविषयी दरारा निर्माण केला. राज्याच्या आत चिवट अजिंक्यपणा निर्माण केला. शिवाजीचे मोठेपण या संदर्भात ठरणार आहे. शिवाजीने अफजुलखानाला दगा दिला, की दगा करू इच्छिणाऱ्या अफजुलखानाचा डाव त्याच्यावर उलटविला यावर त्याचे मोठेपण ठरणार नाही. केलेले तह मोडले गेले याची जबाबदारी शिवाजीवर येते, की इतर कुणावर हा मुद्दा गौण आहे. शुद्ध इतिहास म्हणून जावळी शिवाजीने दग्याने जिंकली काय याचा विचार करावा