पान:परिचय (Parichay).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपती शिवाजी महाराज । १०१

असे मानणे हा वेडेपणा आहे हे काळयांनाही पटते. तरीही तह मोडला यात शिवाजीचा दोष नाही असे समर्थन केल्याविना त्यांना राहवत नाही. जणू तह मोडण्याची संधी औरंगजेबाने साधावी व काळे यांना समर्थनाची सोय उरावी यावर शिवाजीचे मोठेपण अवलंबून होते ! शिवाजीने सुरत लुटली. हा महाराष्ट्राचा गुजराथवर आक्रमक हल्ला आहे, शिवाजीने कारंजे लुटले हा महाराष्ट्राचा विदर्भावर आक्रमक हल्ला आहे, ही भूमिका जितकी वेडेपणाची होईल तितकीच तह मोडण्यात 'शिवाजीची चूक नव्हती, हो, नव्हती' ही भूमिका 'शहाणपणाची' होईल ! सुदैवाने अशी ठिकाणे ग्रंथात फार थोडी असून एकंदरीत चरित्रनायकाकडे पाहण्याची भूमिका प्रभावित करण्याइतकी महत्त्वाची नाहीत. काळे यांनी अशी समर्थने क्वचित का होईना दिली आहेत. याबद्दल कडक तक्रार जशी वाजवी आहे; त्याचप्रमाणे ही ठिकाणे थोडी आहेत याबद्दल अभिनंदन उजू आहे. शिवाजीचे मोठेपण हिंदुस्थानच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे. ब्राह्मणाबादचा राजा दाहीर, लाहोरचा राजा अनंगपाळ आणि दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहान यांच्या शौर्याविषयी वाद नाही. पण यांच्यापासून आमच्या पराभवाची परंपरा सुरू होते. ही परंपरा १८५७ वर येऊन थांबते. एका अर्थी हे म्हणणे चूक आहे. कारण त्याआधी शक आणि हूण यांच्यासमोर पराभूत होणाऱ्या राजांची यादी कितीही मोठी करू म्हटले तरी अपुरी राहणार आहे. वैयक्तिक शौर्यात कमी न पडणाऱ्या आमच्या परंपरेची ही सतत पराभवाची दु:खद कहाणी आहे. हे दुःख, पराभूत झालेले राजे हिंदू होते याचे नसून जे जे पराभूत झाले त्या सर्वांना जनतेने स्वीकारलेले होते याचे आहे. या सर्व परंपरेला ठळक अपवाद फार थोडे आहेत. सातवाहनातील एखाद दुसरा राजा, राणाप्रतापसारखा, हमीरासारखा एखाददुसरा रजपूत राजा, पुलकेशीसारखा एखादा चालुक्य राजा, एखादा मंदोसरचा यशोवर्मा आणि एखादा शिवाजी. प्रथमदर्शनी ही यादी थोडी मोठी वाटते. पण अजून एका दृष्टीने विचार केला तर ही यादी अधिक आखूड होत जाते. ज्यांनी आक्रमकांना तोंड दिले त्यांच्यापेक्षा ज्यांनी बद्धमल झालेली आक्रमणे उलथून टाकली त्यांचे कर्तृत्व विशेष मानावयाला पाहिजे. या बाबतीत शिवाजीशी तुलना करता येईल असा पुरुष भारतीय इतिहासात शोधून पाहावा लागेल. ज्यांनी जनतेला त्रासदायक वाटणाऱ्या आक्रमक राजवटी उलथल्या आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली जनतेला आत्मीयता वाटणाऱ्या राजवटी निर्माण केल्या हे विधायक कर्तृत्वही दाखविले अशांची संख्या बोटावरसुद्धा मोजता येणार नाही. लक्षावधींची फौज घेऊन औरंगजेब छातीवर वर्षानुवर्षे उभा आहे, त्या फौजेचा पराभव करण्याची शक्ती शिल्लक नाही, राजा पळून जिंजीत जाऊन लपून बसला आहे, तिथेच तो घेरला गेला आहे, या अवस्थेत महाराष्ट्र सतत पंचवीस वर्षे