पान:परिचय (Parichay).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०० । परिचय
 

आवरत नाही.
 पृष्ठ (१०६) वर ते म्हणतात, शिवाजीचे राज्य हे एकच एतद्देशीय राज्य होते. मोगल, विजापूरकर, गोवळकोंडेकर यांची राज्ये उपरी व प्रदेशविस्ताराच्या मागे लागलेली, म्हणून तत्त्वतः असमर्थनीय राज्ये होती. मोगल राजवटी भारतात इ. स. १५२६ ला सुरू होतात. आणि आदिलशाही व कुतुबशाही या राजवटी ज्या बहमनी राजवटीचे अवशेष आहेत ती बहमनी राजवट १३४७ ला. सुरू होते. शिवाजीच्या जन्माच्या आधी स्थापन झालेल्या या राजवटी उपऱ्या फक्त एकाच अर्थाने मानता येतील, तो म्हणजे हिंदुस्थानात मुसलमानांचा प्रवेश असमर्थनीय असल्यामुळे, आजचे हिंदुस्थानातील मुसलमानांचे अस्तित्व असमर्थनीय ठरवणे. हिंदुस्थानात मुस्लिम सत्तांनी प्रवेश केला तो नैतिक कारणे देऊन नव्हे. तेव्हा घोरीच्या भारत स्वारीचे समर्थन करण्याची गरज नाही. पण म्हणून बहमनींची सत्ता उपरी ठरत नाही. नाहीतर द्रविडांनी व्यापलेल्या या भूभागात आपण सर्व आर्याभिमानी उपरे ठरणे भाग आहे. आणि एका उपऱ्याने दुसऱ्या उपऱ्याला अक्कल शिकवणे यांत अर्थ नाही. उपरेपणा एखाददुसऱ्या शतकात संपतो. स्वत: शिवाजी महाराज मुसलमानांना उपरे मानीत नसत. त्यांना दक्षिणेतील प्रस्थापित मुस्लिम राजवटी उपऱ्या वाटत नसत. महाराजांना दक्षिणेत मोगल उपरे वाटले. कारण त्या आधी दक्षिणेकडे मोगलांचा चंचुप्रवेश नव्हता. मोगलांच्या दक्षिणप्रवेशाला आरंभ अकबराच्या काळी झाला. पण महाराजांच्या काळापर्यंत हा आरंभ आरंभच उरला होता. कोणतीही सत्ता जर एतद्देशियांची नसेल तर आरंभी उपरी असते. आदिलशाही सत्तेविरुद्ध शिवाजीचे भांडण ती उपरी आहे म्हणून नसून त्याच्या राज्याच्या अस्तित्वाविरुद्ध ती होती हे आहे. शिवाजीने आपले राज्य कायम केले याचे समर्थन महाराष्ट्रातील जनतेने औरंगजेबाशी झुंज घेऊन ते टिकवले या घटनेने जेवढे होते तेवढे इतर कशानेही होत नाही. प्रदेशविस्तार हे सर्वांचेच सूत्र होते. त्याबद्दल शिवाजी वाखाणला जाऊ शकत नाही. मरेपर्यंत तो प्रदेश विस्ताराच्या मागे होता. शिवाजीच्या राज्याचे समर्थन तो एतद्देशीय राजा होता यासाठी होऊ शकत नाही. तसेच तो हिंदू होता याहीसाठी होऊ शकत नाही. असली समर्थने विनाकारण असतात असे आम्हाला वाटते.
 पृष्ठ १६२ वर काळे म्हणतात-शिवाजी-औरंगजेब तह आधी औरंगजेबाने मोडला. जण औरंगजेबाने जर १६६९ मध्ये तह मोडला नसता तर शिवाजी जन्मभर मोगलांचा मांडलिक राहण्यावर राजी राहिला असता. शिवाजीने मोगलांशी तह केला तो मोडण्यासाठीच. नवे राज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या राजाने, तयारीसाठी वेळ मिळावा, यासाठी केलेला हा तह योग्य वेळ येताच शिवाजीने मोडलाच असता. पूरंदरचा तह शिवाजीने प्रामाणिकपणे पाळण्यासाठी केला होता,