पान:निर्माणपर्व.pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




नित्य आणि नैमित्तिक



 जयप्रकाशांनी निवडणुकीचे आव्हान स्वीकारलेले असले तरी त्यांनी गेली दहा बारा वर्षे चालविलेले भूदान–ग्रामदानाचे कार्य अगदी सोडून द्यायला नको आहे. हा दोर जर त्यांनी तोडला तर त्यांचा संपूर्ण क्रांतीचा पतंग हवेत कुठेतरी भरकटत जाण्याचा खूप धोका आहे. खरी गरज आहे या दोन्ही कार्यक्रमांची व्यवस्थित सांगड घालण्याची, दोन्ही आघाड्यांवर संघर्ष व रचना चालू ठेवण्याची. भूदान–ग्रामदान निस्तेज झाले, कारण त्याला राजकारणाची, प्रस्थापित हितसंबंधांशी झगडण्याची जोड देण्यात आली नाही. आपले गेल्या पंचवीस-तीस वर्षातले राजकारण पोकळ आणि उथळ झाले, कारण भूदान-ग्रामदानासारखा एखादा मूलभूत आणि समाज आणि व्यक्ती यांच्या अंतर्बाह्य परिवर्तनाचा कार्यक्रम या राजकारणाच्या मुळाशी नव्हता. भूदान-ग्रामदान हे नित्याचे कार्य आहे. राजकारण, संघर्ष ही नैमित्तिक स्थळ-काळ-वेळ पाहून करावयाची कामे आहेत. ही दोन्ही साधावी लागतात, एक सोडून दुसरे उभे राहात नाही, टिकत नाही. भूदान–ग्रामदान हे गांधीजींच्या चरख्याचे विकसित रूप आहे. जमीनवाटपाच्या आणि ग्रामीण पुनर्रचनेच्या आपल्या मूलभूत व कळीच्या प्रश्नालाच या आंदोलनाने स्पर्श केला होता. पण दुर्दैवाने हा फक्त पुसटता प्रथमस्पर्श राहिला. भिडायची तयारी न ठेवल्यामुळे या स्पर्शातून वणवा पेटला नाही, शांततामय क्रांतीची प्रक्रियाही चालू राहिली नाही. बिहारमध्ये तर असे भिडायला हवेच होते. अजूनही हवे आहे. स्पर्शाचे एखाद्या धडक मोहिमेत तेथे रूपांतर व्हायला हवे. कारण मोठमोठ्या जमीनदाऱ्या अद्याप बिहारमध्येच टिकून आहेत. तेथील सगळेच पक्षोपपक्ष जमीनदारांचे हितसंबंध सुरक्षित ठेवणारे पक्ष आहेत. अगदी डावेही याला अपवाद नाहीत ! म्हणून भूदान-ग्रामदानाचा एखादा क्रांतिकारक आविष्कार वास्तविक बिहारमध्ये प्रकट व्हायला हवा. पण तसे अद्याप तरी घडलेले नाही. उलट विनोबांचेच बिहारमध्येच वॉटर्लू झाले. हे चित्र जयप्रकाश बदलू शकले तर ती खरी संपूर्ण क्रांतीची सुरुवात ठरेल. नाहीतर ‘ उजाडले पण सूर्य कुठे' अशी अवस्था होईल; वातावरण तापेल, नवे वारे वाहतील, हे गरिबी हटावच्या वाऱ्यांपेक्षा नक्कीच चांगले व आरोग्यदायी असतील, नव्हे आहेतही.

निर्माणपर्व । ९८