पान:निर्माणपर्व.pdf/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पर्यायी जनता कापड पेठ हा युवकांचे वय आणि अनुभव लक्षात घेता खरोखरच एक भव्य व धाडसी प्रयोग होता. मागे डॉक्टरांच्या संपाच्या वेळी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पुण्यात दोन-चार ठिकाणी रस्त्यावरच रुग्ण सेवेची केंद्रे काही तरुण डॉक्टरमंडळींनी चालवलेली होती. त्याच धर्तीचा पण अधिक मोठ्या प्रमाणावरचा हा नू. म. वि. मधील पर्यायी कापड पेठेचा प्रयोग म्हणता येईल. आठवडाभर ही पेठ भरभरून वाहात होती. लाख दीड लाख ग्राहक तरी या कालावधीत पेठेला भेट देऊन गेले असावेत. आठवडाभरच्या विक्रीचा आकडा दहा-बारा लाखांच्या घरात गेला होता. या आकडेवारीपेक्षाही या प्रयोगामागील योजकता, व्यवहारकौशल्य, जबाबदारीची जाणीव आणि धडाडी यांचे मोल विशेष आहे. सातआठ दिवस अशी पर्यायी कापड पेठ युवक संघटित करू शकतात, पैचीही अफरातफर न होता लाखो रुपयांच्या उलाढाली पार पाडू शकतात, ही एकूण युवक चळवळीलाच भूषण आणणारी घटना आहे. ठाणे जिल्ह्यातील मनोरजवळ, आदिवासींच्या आर्थिक-सामाजिक पुनरुत्थानाचे कार्य करणारे ‘भूमिपुत्र प्रतिष्ठानचे ' आबा करमरकर यांचा युवक चळवळीवरील एक नेहमीचा आक्षेप आहे. युवक संघर्षाला उत्सुक असतात पण रचनात्मक काम म्हटले की बिचकतात. त्यातला तपशील, आकडेवारी, आर्थिक गुंतागुंत, किचकट व्यवहार त्यांना मानवत नाही. या जंजाळापासून लांब राहण्याची युवक संघटनांची व त्यांच्या नेत्यांची प्रवृत्ती असते. पुण्यातील युवकानी वेळप्रसंगी आपण हे व्यावहारिक उलाढालींचे आव्हानही यशस्वीरीत्या पेलू शकतो, हे या पर्यायी कापड पेठेच्या प्रयोगाने निश्चितच सिद्ध करून दाखविले आहे. यापूर्वीही तेल, तूप इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे लाखो रुपयांचे व्यवहार या युवकांनी उरकले होते; त्यामुळे ही कापड पेठ चालविणे हा त्यांच्या हातचा मळ ठरावा हे साहजिकच आहे. पण योग्य त्या बिंदूवर थांबणे, व्यवहाराच्या फापटपसाऱ्यात गरजेपेक्षा अधिक न अडकणे, यापक उद्दिष्टांवरची नजर ढळू न देणे, याही गोष्टींना चळवळीत फार महत्त्व असते. लाखो रुपये मोलाचे, केवळ विधायक कार्य, आजवर अनेकांनी अनेक ठिकाणी केलेले आहे. अनेक करीतही आहेत. केवळ संघर्षात्मक चळवळीही पेटतात आणि विझतात. या दोन्ही बाजूवर व्यवस्थित पकड जमवणे अवघड असते. पुण्यातील युवकांनी व त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या असंख्य स्त्री-पुरुष नागरिकांनी ही पकड ऑपरेशन लक्ष्मीरोडद्वारा उत्तम तऱ्हेने जमवून दाखवली यात शंका नाही. रचनात्मक संघर्षाचा हा एक वस्तुपाठच होता. ग्राहकांनी बहिष्काराचे शस्त्र पुनः पुन्हा उपसले, कापड भाव गडगडू लागले तर एक नवेच संकट या ग्राहकचळवळीसमोर उभे राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या वृत्तपत्रात एक वार्ता झळकली आहे. वार्तेत म्हटले आहे --

ऑपरेशन लक्ष्मीरोड । ९५