Jump to content

पान:निर्माणपर्व.pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हिमालयाच्या अलीकडे आणि पलीकडे



 हिंदुस्थानात डांगे आणि त्यांचे सहकारी ज्या सुमारास कम्युनिस्ट पक्षाची बांधणी करीत होते त्याच सुमारास चीनमध्येही कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. पण गेल्या पन्नास वर्षातील या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या वाटचालीत केवढी तफावत पडली ! चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष केवळ सत्तेवर आला एवढेच नाही; नवचीनची या काळात उभारणीही झाली. चिनी माणसाचे जीवनमान सुधारले, सामाजिक संबंधात बदल घडून आले, जागतिक सत्ता म्हणून चीनला मान्यता लाभली. हिंदुस्थानात मात्र कम्युनिस्ट पक्षाची सतत पिछेहाट होत गेली. स्थापनेपासून महायुद्ध सुरू होईपर्यंतच्या काळात या पक्षाची कमान चढती होती. बेचाळीसनंतर मात्र ही कमान ढासळत गेली. सध्या तर बिहारसंबंधी पक्षाने घेतलेल्या जनता विरोधी भूमिकेमुळे ही कमान जमिनीत पुरती गाडलीच गेलेली आहे; जयप्रकाशांना 'गुंड', सी. आय. ए. चे हस्तक म्हणून या पक्षाने ठरवावे, यापेक्षा भारतीय जनमानसाचे अज्ञान अधिक भयानक असू शकत नाही. डांगे यांचा अमृत महोत्सव साजरा झाला, डांगेकन्या रोझा देशपांडे मुंबईतून लोकसभेवर निवडून गेल्या किंवा केरळात अच्युत मेनन यांचे मंत्रिमंडळ अधिकारारूढ असले, तरी, स्वतंत्र पक्ष म्हणून उजव्या कम्युनिस्टांचे अस्तित्त्व जवळ जवळ संपलेले आहे. डावेही बंगाल–केरळव्यतिरिक्त कुठे उभे नाहीत. हिंदुस्थानपुरते बोलायचे झाल्यास लाल क्रांतीच्या सर्व वाटा आज तरी रोखलेल्या दिसतात. हिमालयापलीकडे, आपल्या शेजारीच असलेल्या, आपल्याप्रमाणेच प्रचंड आकार व प्राचीन परंपरा लाभलेल्या चीनमध्ये पन्नास वर्षांच्या कालावधीत राज्यक्रांती व समाजक्रांती होते, लालसूर्य उगवतो व आपल्याकडे मात्र या सूर्याला ग्रहणच लागते, असे का ? विचारसरणी एकच, मिळालेला कालावधीही दोन्हीकडे जवळपास सारखाच. मग यशःप्राप्तीत जमीनअस्मानचे अंतर का पडावे ? दोन्हीकडच्या परिस्थितींचे वेगळेपण हे कारण मार्क्स-लेनिनवादी पुढे करतील. पण ते पुरेसे नाही, निर्णायक नाही. रशियापेक्षा चीनची परिस्थिती वेगळी होती, तरी चीनमध्येही लाल क्रांतीला यश लाभले. तशीच वेगळी परिस्थिती हिंदुस्थानात असली म्हणून क्रांती न होण्याचे काहीच कारण नव्हते.

निर्माणपर्व । ८८