पान:निर्माणपर्व.pdf/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.मुक्तिसंग्राम ! तळाशी दबलेल्या, खेड्यातील अखेरच्या माणसाला, शहरातील सर्वसामान्य स्त्रीपुरुष नागरिकाला पुरेसे अन्न, वस्त्र आणि निवारा, शिक्षण आणि समान वागणूक या गोष्टी प्राप्त होत नाहीत तोवर मूठभरांना या देशात चैनबाजीत आणि विशेष समृद्धीत लोळण्याचा अधिकार नाही. हे एक ध्रुवसत्य विसरले गेल्यामुळे आपल्या नियोजनाची परवड झाली. गोरगरीब व मध्यम परिस्थितीतले लोकही अन्नान्नदशेला लागले, देशात भ्रष्टाचार, महागाई, टंचाई, बेकारी माजली, देश कर्जबाजारी झाला, परकीयांची दडपणे वाढत गेली.

 या सर्वांतून मुक्त होणे हा पुण्यात शनिवारवाड्यासमोर एक ऑगस्ट (१९७४)ला झालेल्या मोर्चा व उपोषणाचा, दिवसभराच्या चर्चेचा, सायंकाळच्या सभेचा व सभेच्या शेवटी घेतल्या गेलेल्या प्रतिज्ञेचा मुख्य आशय होता.

 आपल्या राजकीय-सामाजिक व सांकृतिक जीवनाचे शुद्धीकरण ज्यामुळे होऊ शकेल; असे स्वदेशी-बहिष्काराचे अनेक कार्यक्रम, लोकांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारावयाची व्रते-उपक्रम त्या दिवशी विविध गटचर्चेतून पुढे आले होते. यातील एक वातानुकूलित इमारती, खोल्या, यंत्रसामग्री यासंबंधी होता. खरोखर या देशात या यंत्रसामग्रीची गरज आहे का ? रुग्णालये वगैरे अगदी किरकोळ अपवाद वगळता या यंत्रसामग्रीचा, त्यामुळे काही थोड्यांना लाभणाऱ्या सुखसोयींचा, आपल्या देशाच्या सद्यःस्थितीशी काही मेळच बसत नाही. शहरीकरणाचा रोग फैलावतो आहे. हा रोग सुसह्य करण्यासाठी त्यावर हा आणखी एक श्रीमंती इलाज सुरू आहे. बहुसंख्य लोक जोवर उन्हातान्हात, चिखलामातीत काम करताहेत, कोंदटलेल्या, गलिच्छ, अंधाऱ्या जागेत राहाताहेत तोवर अगदी मोजक्या वरिष्ठ वर्गाने ही ऐषाराम वाढवणारी चैन उपभोगणे हे संपत्तीचे एक चालू स्थितीत न परवडणारे, असमर्थनीय व अश्लाघ्य प्रदर्शनच आहे. विषमता वाढवणाऱ्या आपल्या चुकीच्या नियोजनाचे हे एक डोळ्यांना खुपणारे प्रतीकही आहे. हे प्रतीकच हटवले, काढून टाकले तर?


-६
मुक्तिसंग्राम । ८५