'विचार ठीक. पण आम्ही काही करू शकणार नाही. कारण कामगार संघटनांची आमची सगळी बैठकच यामुळे विस्कटणार आहे.' या बैठकीत अनेकांचे अनेक हितसंबंध गुंतलेले. कोण या हितसंबंधावर पाणी सोडायला तयार होणार ? शिवाय कामगारांनाही हे पटणार नाही. कोकणातून आलेला कामगार परत कोकणात जायला तयार नाही. गिरण्या बंद पडल्या तरी बेकार अवस्थेत मुंबईतच तो कसेबसे दिवस काढेल पण मुम्बई सोडणार नाही. हा प्रस्थापित मजूरवर्गाचा विरोधही चळवळीला गृहीत धरावा लागेल. हा विरोध कमी कसा होईल, कामगारसंघटना यात पुढाकार कसा घेतील हे पाहावे लागेल. अशी साथ मिळाली नाही तर चळवळ फार पुढे सरकणार नाही. तिचे अर्थही वेगवेगळे लावले जातील.
असे काही घडले, घडवले तर टिळकांचा वारसा आपण पुढे नेला असे होईल. विशेषतः ही जबाबदारी विरोधी पक्षांवर आहे. पर्यायी पक्षाचा दावा करणाऱ्यांवर तर विशेषच. कारण यामुळे आपला विरोध विधायक स्वरूपाचा आहे हे ते जनमानसावर ठसवू शकतील. आज सर्व अभिक्रम (Initiative) शासनाकडे, शासनकर्त्या पक्षाकडे; विरोधकांकडे फक्त विरोध नोंदविणे, ओरडणे एवढेच प्रतिक्रियात्मक कार्य उरले आहे. हे चित्र पालटेल, अभिक्रम शासनाकडून खेचून घेता येईल. एक स्वयंभू, स्वयंशासित व आत्मनिष्ठ चळवळ उभी राहील. जिचा जनसामान्यांच्या प्रत्यक्ष आचरणाशी, दैनंदिन जीवनाशी काहीतरी संबंध पोहोचेल. आज यासाठी काही स्वार्थत्याग करावा लागेल, प्रस्थापित हितसंबंधावर पाणी सोडावे लागेल हे खरे. पण एक कालखंड यामुळे उजळून निघेल, देशाची घडी बदलण्याचे श्रेय मिळेल. जनतेचे चैतन्य पुन्हा जागे होईल. हे केवढे मोठे यश आहे!