आंतरराष्ट्रीय कंपन्यांची जाळी पसरत आहेत. आपल्याकडेही अमेरिकन, जर्मन, जपानी कंपन्या येतात, आपल्याही कंपन्या अन्य देशात जातात. कोलॅबरेशन्स वाढत आहेत. भारत सरकारचे धोरण काहीही असो. अगदी गरज नसलेल्या हॉटेलच्या धंद्यातही ही कोलॅबरेशन्स आता मान्यता पावली आहेत. ओबेरॉय-शेरेटन या हॉटेलच्या उद्घाटनाला आमच्या अर्थमंत्र्यांनी यावे याचा दुसरा अर्थ काय ? एकीकडे ही कोलॅबरेशन्स घातक असतात असे बोलायचे आणि दुसरीकडे त्यांचेवर सरकारी वरदहस्तही ठेवायचा, हा दुटप्पीपणा संतापजनक आहे. तरी तोही आपण खपवून घेत आहोत. परदेशी पाहुण्यांसाठी हे करावे लागते हा फक्त वरवरचा देखावा आहे. वर्षभरातली या हॉटेलांची रजिस्टरे तपासली तर परदेशीयांपेक्षा आपलीच बड़ीबडी मंडळी तेथे, या नाही त्या कारणास्तव जाऊन आलेली, जात असलेली दिसतील. हा अगदी टिळक-गांधींच्या स्वदेशी चळवळीचा खून आहे. पण तोही आपण उघड्या डोळ्यांनी पाहण्याइतके निर्ढावलो आहोत.
तेव्हा या कोलॅबरेशन्स बहिष्कार टाकणे हाही स्वदेशी चळवळीचा आजचा मार्ग ठरू शकत नाही. कारण सामान्य लोकांच्या आवाक्यात येणारे हे क्षेत्रच नाही. बहुतेक कोलॅबरेशन्स उंची वस्तूंच्या निर्मितीतली आहेत किंवा अगदी औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक घटकांतील आहेत.
अपवाद आहेत. उदाहरणार्थ कोका कोला हे पेय. काही टुथपेस्टस् इत्यादी.
गेल्या आठवड्यात गोखले इन्स्टिटयुटमधील काही अभ्यासकांशी या विषयावर बोलत होतो. यापैकी सौ. कुमुद पोरे यांनी हा मार्ग सुचविला. लोकांनी या वस्तू वापरू नयेत असे त्यांचे म्हणणे. हवा कशाला कोकाकोला ? पूर्ण परदेशी किंवा कोलॅबरेशन्समधील टुथपेस्टस् यादी जाहीर करावी. लोकांनी या वापरू नयेत म्हणून प्रचार करावा.
मी त्यांना एक अनुभव सांगितला. परवाच्या भारत-पाक युद्धाच्या वेळी अमेरिकेने आपल्याला दगा दिला, पाकिस्तानची बाजू घेतली. बंगालच्या उपसागरात सातवे आरमार आणले. यामुळे तरुण संतप्त झालेले होते. साधना
(साप्ताहिक) कार्यालयात एक बैठक झाली. अमेरिकेचा कडक निषेध करणारी भाषणे झाली. एक मोर्चा काढण्याचेही ठरत होते. मी सुचविले-एखादी क्रांतिकारक कृती करा. कमीत कमी एखाद्या अमेरिकन वस्तूवर बहिष्कार पुकारा.
पुढे तास, अर्धा तास चर्चा होऊनही अशी वस्तू-जी सर्वांना चटकन समजेल, अशी सापडेना. कोका कोलाचे नाव मी सुचविले. पण कुणी ते मनावर घेतले नाही.