पान:निर्माणपर्व.pdf/82

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुंदोपसुंदाचे मरण फक्त त्यांच्या परस्परांच्या हाती होते. तिसरा कोणीही त्यांस मारण्यास समर्थ नव्हता. तेव्हा त्या उभयतांमध्ये कलह उत्पन्न करणे एवढाच उपाय देवांच्या हाती उरलेला होता. सर्व जग पादाक्रांत करू पाहणाऱ्या युरोपातील बलाढ्य राष्ट्रांची आज सुंदोपसुंदांच्या सारखीच स्थिती आहे. ते आपापसात लढतील तरच मरतील. नाहीतर सर्व जग गिळून टाकतील. तेव्हा त्यांच्या आहारी पडलेल्या किंवा पडण्याच्या बेतात असलेल्या राष्ट्रांनी या दुनियेस लुबाडू पाहणाऱ्या दरोडेखोरांची आपापसात कलागत कशी लागेल ही चिंता वाहिली पाहिजे. स्वदेशी, बहिष्काराच्या शस्त्राचा शहाणपणाने उपयोग केल्यास हिंदुस्थानची बाजारपेठ तिलोत्तमेप्रमाणे हे यादवीचे कार्य हटकून घडवून आणील.

- लो. टिळक टिळकांनी स्वदेशी चळवळीचा उठाव केला. आजही या चळवळीची गरज आहे. पण टिळकांच्या काळाप्रमाणे आज स्वदेशी आणि परदेशी वस्तूतला फरक स्पष्टपणे लोकांसमोर मांडता येत नाही ही अडचण आहे.

 अगदी पहिली अडचण परदेशी वस्तूंची आपल्यावर पडलेली मोहिनी ही आहे.

 नक्षलवादी विचाराचा एक तरुण माझ्याकडे नेहमी येतो. त्याच्या मनगटावर एक भारी किंमतीचे घड्याळ मी पाहतो. एकदा मी त्याला सहज विचारले- घड्याळ कुठून घेतले ? किंमत किती ? तीनशे रुपयाच्या आसपास किंमत असलेले घड्याळ त्याला शे-दीडशे रुपयात पडले होते. म्हणजे ते 'स्मगल' केलेले होते. त्यालाही ते पटले.

 चांगली घड्याळे हिंदुस्थानात तयार होत असूनही आपल्याला परदेशी वस्तूंचे असे आकर्षण वाटत असते -अगदी नक्षलवादी युवकांनाही.

 दुसरा गट राष्ट्रवादी युवकांचा. जनसंघाने आपली स्वदेशी योजना जाहीर करून तीन वर्षे उलटली. पण याबाबत, प्रत्यक्ष पावले अजून उचलली गेली नाहीत. परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची एखादी चळवळ जनसंघ हाती घेईल अशी कल्पना होती. पण अजून तरी काही हालचाल नाही. अगदी परवाच्या हुबळी अधिवेशनातही स्वदेशी योजनेच्या पुनरुच्चारापलिकडे काही घडले नाही.

 पण समजा जनसंघाने किंवा अन्य कुठल्या पक्षाने परदेशी वस्तूंच्या बहिष्काराची चळवळ हाती घ्यायचे ठरवले तरी खरी अडचण पुढेच आहे.

 स्वदेशी आणि परदेशी असा भेदभाव करायचा कसा ?

एक ऑगस्ट । ८१