पान:निर्माणपर्व.pdf/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.



एक ऑगस्ट



 बहिष्काराचे तत्त्व पाच वर्षे देशाने इमानेइतबारे पाळले तर युरोपात लढाई उत्पन्न झाल्याशिवाय राहात नाही. आजचे सारे राजकारण व्यापाराच्या खुंटाभोवती घुटमळत आहे. युरोपातील प्रत्येक प्रबळ राष्ट्र जगातील बाजारपेठा काबीज करण्यासाठी रात्रंदिवस धडपडत आहे. हिंदुस्थानची बाजारपेठ इंग्रजांनी सर्वस्वी व्यापून टाकली आहे ही गोष्ट युरोपातील प्रत्येक बलाढ्य राष्ट्राच्या मनात शल्यासारखी बोचत आहे. आपल्यात इंग्रजांशी लढण्याचे सामर्थ्य नाही. तेव्हा इंग्रजांशी लढण्यास जे समर्थ आहेत त्यांना तरी आपण चिथावू या. हिंदुस्थानची बाजारपेठ इंग्रजांच्या मगरमिठीतून सोडवून जर्मनांच्या अगर अमेरिकनांच्या हातात काही काळ आपणास देता आली तर इंग्रज लोक त्यांच्याशी वर्दळीवर आल्यावाचून खात्रीने राहणार नाहीत आणि इंग्रज लोक कोठेतरी बाहेर भांडणात गुंतल्यावाचून आपणास आपले हातपाय पसरण्यास अवकाश मिळावयाचा नाही. हिंदुस्थानच्या बाजारपेठेतून इंग्लंडला हुसकावून जर्मनीला आत घेतल्यास तोही एक दिवस आपली मानगुटी धरल्यावाचून राहणार नाही हे खरे आहे. परंतु बहिष्कारास स्वदेशीची जी जोड देण्यात आली आहे, ती, हे भावी संकट टाळता यावे म्हणूनच देण्यात आली आहे. स्वदेशीच्या सहाय्याने परदेशी व्यापारांच्या दाढेतून जेवढा प्रांत आपणास सोडविता येईल तेवढा सोडविण्यात कसूर करावयाचीच नाही. परंतु आज आपणास स्वदेशी सर्वांगपरिपूर्ण करता येणे शक्य नाही. तेव्हा स्वदेशीच्या कक्षेबाहेर राहणाऱ्या मुलखातून इंग्रजांची हकालपट्टी करणे आपणाला आवश्यक आहे. बहिष्काराने शत्रूच्या शत्रूस चिथविणे व स्वदेशीने आपले घर दुरुस्त करणे असा हा दुहेरी डाव आहे. काट्याने काटा काढल्यानंतर तो काही कोणी आपल्या पायात रुतवून घेत नाही. बहिष्कार हे नैमित्तिक कर्म आहे; स्वदेशी हे नित्यकर्म आहे. शत्रूच्या घरात यादवी माजविणे अगर शत्रूच्या शत्रूस उत्तेजन देणे एवढाच आत्मोद्धाराचा मार्ग दुर्बलांना नेहमी मोकळा असतो. सुंदोपसुंदांची कथा हे या तत्त्वाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

निर्माणपर्व । ८०