काही बहाद्दर तर किती तरी वेळ दारच उघडत नसत...काही सवाई बहाद्दरांनी तर कुत्रीदेखील अंगावर सोडायला कमी केलं नाही ! पण हे क्वचितच. बाकी सगळीकडे दिसला तो बंधुभाव .. त्यागी वृत्ती..आपुलकी आणि कौतुक !!
डेक्कन क्वीनमध्ये असेच गंमतीदार अनुभव आले. बिहार परिवाराचे आम्ही स्वयंसेवक जवळ आलो की, काहीजण चक्क झोपेचे सोंग घेत. तर काही शेजारच्या माणसाला माहिती सांगताना, आपण 'त्या' गावचे नाही असा आव आणत. काहीजण भांडत. विचारत, “ बिहारला मदत का ? रत्नागिरिला का नाही ?" याचं उत्तर आपली संस्कृती. स्वतःआधी इतरेजनांना मदत करणे हा आपला धर्म आहे, नव्हे काय? असा प्रश्न विचारून उत्तर दिलं की, मग पैसे निघायला वेळ लागत नसे. एक जण तर चक्क भांडलाच. आवाज काय चढविला... तुम्ही पैसे खाताय... लोकांना फसवताय... असा आरोप काय केला.. त्याला वाटलं आम्ही ‘बिहार रिलीफ फंडा' साठीच पैसे गोळा करीत आहोत. इतर प्रवासी त्याला त्याची चूक समजावून सांगू लागले. आम्हांला भरपूर मदत करू लागले आणि मग त्याचा पडलेला चेहरा पाहण्याचा मोह आवरताना मलाही फार कष्ट पडले !
काही ठिकाणी लोक घरात बोलवत. बसायला सांगत. इतकंच नाही तर तुम्ही दमला असाल, असं म्हणून खायला-प्यायला देत. पैसा बिहारला पोहोचण्याबद्दल शंका व्यक्त करीत. पण आमच्यातले काही जण प्रत्यक्ष विहारमध्ये जाऊन धान्य वाटप करणार आहेत, हे ऐकून समाधान व्यक्त करीत. मदत करीत. अकरा रुपयांची ..सहा रुपयांची! काही जण दहाच रुपये देत. अकरा रुपयांत एक बिहारी एक महिना जगू शकेल हे कळल्यावर, खुशीनं एक रुपया वाढे. पावती फाडली जाई ती अकरा रुपयांचीच ! काही सांगत आम्ही आधीच मदत केली आहे, मग पुन्हा कशासाठी ? त्यांना समजावून सांगावं लागे, मदतीची आवश्यकता पटवली जाई। विद्यार्थ्यांविषयी विश्वास निर्माण केला जाई आणि मग मदत मिळे ती देखील अतिशय समाधानाने !
दुपारी दीडला काम थांबलं. जेवण आणि विश्रांती झाल्यावर दुसऱ्या भागात पुनश्च काम सुरू झालं. संध्याकाळी लोक फिरायला बाहेर पडत. पुण्यातील विविध कॉलेजचे युवक अन् युवती एकत्र येऊन लोणावळ्यात हे काम करीत आहेत, हे पाहून त्यांना समाधान वाटत असे. रस्त्यावरच्या लोकांना थांबवून विनंती केली जाई. पैसे मिळत. काही लोक तर स्वत:चे पत्ते देत व अधिक पैसे घेऊन जायला सांगत. संध्याकाळी एके ठिकाणी लग्न होतं. लोणावळ्यातील बरेच प्रतिष्ठित लोक येणार आहेत असं कळलं. चार जणांची एक तुकडी रवाना झाली. बऱ्याच वेळाने ही तुकडी हात हलवीत परत आली. मात्र पानसुपारी व (वाटाण्याच्या) अक्षता त्यांना मिळाल्या !!