सर्वसाधारण शेतकरी सुदृढ असायला हवा. ब्रिटिश येण्यापूर्वी शेतकऱ्याजवळ असलेले जोडधंदे त्याला ही सुदृढता प्राप्त करून देत होते. या आधारामुळे दुष्काळ किंवा इतर प्रासंगिक आपत्ती आल्याच तर एकदम तो रस्त्यावर फेकला जाण्यापासून वाचू शकत असे. जोडधंदे हा एकप्रकारे त्याचा आयुर्विमा ( Insurance ) होता, पूरक अन्न होते. ब्रिटिशांनी हे जोडधंदे शेतकऱ्याकडून काढून घेतले. हेतुपुरस्पर, आपल्या साम्राज्यविस्तारासाठी, या जोडधंद्यांचे खच्चीकरण केले. हे सत्य टिळकांपेक्षाही अधिक स्पष्टपणे गांधींनी ओळखले - त्यावर खादी ग्रामोद्योगाची मात्रा सुचवली. ही मात्रा आज जशीच्या तशी उगाळून अर्थातच चालणार नाही. काळ पुष्कळ पुढे सरकला आहे. घड्याळाचे काटे मागे फिरवता येत नाहीत. परंतु १८८०-९० साली दुष्काळावर ब्रिटिशांनी, त्यांना सोयीस्कर असे शोधून काढलेले इलाज, आज, आपण काहीही सुधारणा, बदल, न करता, जसेच्या तसे अंमलात आणतच आहोत ना ? या तात्पुरत्या इलाजांनी, आपला, दुष्काळामुळे आज रस्त्यावर आलेला, उद्या, लोकसंख्येच्या दबावामुळे पुन्हा गावाबाहेर फेकला जाणारा शेतकरी वाचणे शक्य नाही. स्वदेशीचा नवा काहीतरी अर्थ लावून ग्रामोद्योगांना चालना देणे, शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर स्थिर करणे, हाच या ऱ्हासावरील कायमचा उपाय आहे. फार थोडी जमीन असलेला जपान जे करू शकला, पन्नास वर्षापूर्वी झाडाच्या साली खाऊन दुष्काळाला तोंड देणारा चीन, वाढती लोकसंख्या असतानाही जे साधू शकला, ते आपल्यालाही साधणे अशक्य नाही. लोकशाही समाजवादाची चालू चौकट जरी नीट राबवली तरी हे जमू शकेल. अधिक क्रांतिकारक व तरुण शक्ती पुढे सरसावल्या तर चीन-जपानलाही आपण मागे टाकू शकू. का नाही ?
पान:निर्माणपर्व.pdf/63
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
डिसेंबर १९७२
निर्माणपर्व । ६२