पान:निर्माणपर्व.pdf/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.दुसरी एक अशीच तुकडी कुरंगीला पाठवावी असे ठरते. या गावचा एक आदिवासी शिबिराला आलेला असतो. त्याची जमीन इतर कुणी बळकावलेली असते. सात-बाराचा उतारा वगैरे त्याने बरोबर आणलेला असतो. गावाला जाऊन याबाबत खरी परिस्थिती काय आहे हे जाणून घेणे, हे या दुसऱ्या तुकडीचे काम असते.

 एक फेब्रुवारीचा दिवस उजाडला. पहिली तुकडी चार भाकऱ्या व मिरच्या पिशवीत बांधून एस टी. स्टॅडवर पोचली . तास झाला. दीडतास होऊन गेला. तरी दरा-धडगाव गाडीचा पत्ता नाही. चौकशी करता समजले, की गाडी बिघडली आहे. वेळेचा काहीच भरवसा सांगता येत नाही. असे घोटाळे येथे वरचेवर होतच असतात. कार्यक्रम सगळे विस्कटून जातात.

 सायकली किंवा जीप मिळते का हे पाहण्यासाठी ही तुकडी पुन्हा शिबिराच्या जागी येते. गोविंदराव शिंदे, अंबरसिंग शिबिराचा समारोप करण्याच्या बेतात असतात.

 जीपसाठी निरोप जातो. गोविंदराव शिबिर संपता संपता एक बातमी सांगून तेवढ्यात सगळ्यांना थक्क करून सोडतात. बातमी अशी-

 -मेळावा संपल्यावर अमुक अमुक गावचा एक आदिवासी आपल्या मालकीच्या पण सावकाराने बळकावलेल्या शेतात गेला. त्याने पीक कापायला सुरुवात केली. सावकाराने पोलीस पाठविले. आदिवासीने पोलिसांना कागदपत्र दाखविले. पोलिसांची खात्री पटली. काहीही कारवाई न करता पोलीस परत गेले.

 शिबिरात टाळ्यांचा कडकडाट होतो.

 जीपची सोय झालेली आहे असा निरोप येतो.

 एक वयस्क आदिवासी तेवढयात येऊन बाजूला बसलेला असतो, हे कुणाच्या लक्षात येत नाही. अंबरसिंगचे व त्याचे हळू आवाजात काहीतरी बोलणे चालू असते. पहिल्या तुकडीतले, जीपची वाट पाहणारे तरुण कान टवकारतात. गोविंदरावही ओढले जातात. शिबिर आवरलेले असल्याने घोळका आणखीनच वाढतो.

 वयस्क आदिवासी असतो सलसाडीचा. त्याने बातमी आणलेली असते, की मेळाव्यानंतर, सलसडीच्या शिवारातील एका आदिवासीच्या जमिनीवरचे पीक बाहेरगावचे मजूर बोलावून सावकार रातोरात कापायला आला. सलसडीच्या आदिवासींना ही गोष्ट समजली. त्यांनी शेतावर जाऊन सावकाराच्या माणसांना रोखले, पीक कापू दिले नाही. सावकाराने पोलीस बोलाविलेले आहेत. दोन्ही बाजूचे लोक शेतावर बसून आहेत.

शहादे । ४३