पान:निर्माणपर्व.pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




 आपल्याकडचे लॉ अँड ऑर्डरवाले तरबेज असतात हे माझे आदल्या दिवशीच गाडीत व्यक्त केलेले मत टेंबे यांना थोडे पटू लागलेले होते. त्यांचे मत वेगळे होते. आपल्याकडील शासनयंत्रणा झोपलेली असते असाच जवळजवळ त्यांचा अनुभव होता. मी म्हणत होतो : यंत्रणा झोपू शकते, अनेकदा झोपतेही. पण एखाद्या विषयात जागे राहायचे तिने ठरवले तर तिला अशक्य काही नाही.

 संध्याकाळी आम्ही शहाद्याला पोचलो.

 सातपुडा सर्वोदय मंडळातर्फे एक पत्रक छापून तेथे वाटण्यात आलेले होते . मंडळातर्फे तालुक्यातील काही गावातून शांतियात्रेचा एक कार्यक्रम योजण्यात आलेला होता. आम्ही तेथे येणार हे अगोदर कळविलेले होते. आमच्या येण्याची आणि या शांतियात्रा कार्यक्रमाची सांगड मंडळाच्या लोकांनी आपल्याच मनाने घालून त्याप्रमाणे प्रसिद्धी करून ठेवलेली होती. २२ ते २६ आसपासच्या गावातून शांतियात्रा व २७ ला शहादे येथे सभा असा भरगच्च कार्यक्रम जाहीर झालेला होता.

 हे प्रसिद्धीपत्रक कलेक्टर, डी. एस्. पी. कडे धुळ्याला पोचलेले असणार हे उघडच होते.

 सकाळच्या मुलाखतीमागील धागे-दोरे शेवटी असे उलगडले.

 शांतियात्रेतून अशांतता माजू नये यासाठी लॉ अँड ऑर्डरवाल्यांनी अशी दक्षता बाळगलेली होती.



 ही दक्षता पुढील दोन दिवसात वाढत गेली. लॉ अँड ऑर्डरवाल्यांनी आम्हाला जवळ जवळ नजरकैदेतच अडकवून ठेवलेले होते.

 शहादे पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी श्री. अंकोला व चार पाच हवालदार पहिल्या दिवशी सतत आमच्यासोबत ! शिवाय सी. आय. डी. ची दोन माणसे.

 निघण्यापूर्वी आम्ही अंकोला यांना सांगून पाहिले, “ तुम्ही गणवेशात व हत्यारानिशी बरोबर असल्यावर कोण आमच्याशी मोकळेपणे बोलणार ? धुळयाला फोन जोडून द्या. वाटल्यास आम्ही कलेक्टर, डी. एस्. पीं. शी बोलून घेतो.'

 ' बोलून काही उपयोग होणार नाही. इथल्या परिस्थितीत काय करायचे याचा निर्णय शेवटी मीच घेणार. आणि तुमच्या संरक्षणासाठी बरोबर रहायचे असे आम्ही ठरवलेले आहे.'

निर्माण पर्व । ३२