पान:निर्माणपर्व.pdf/226

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

द्वेषाने आंधळेपणा आला. जो तो पुन्हा आपल्या पूर्वीच्या कोषात बंदिस्त झाला. जयप्रकाशांनी आणि आणीबाणीने हे वेगवेगळ्या प्रवाहात पोहणारे मासे एका मोठ्या समुद्रात आणून सोडले; पण समुद्रात पोहण्याचा सराव नसल्याने सगळ्यांच्या नाकातोंडात पाणी गेले आणि मूळच्या लहान प्रवाहाकडे जो तो वळला आहे. सगळ्यांनी एकाधिकारशाहीविरोध, म्हणजेच इंदिरा विरोध हे आपले मुख्य प्रचारसूत्र ठेवलेले दिसते. म्हणजे पुन्हा, ७१-७२ चीच चूक. कल्पनादारिद्रयही तसेच. बाई त्यावेळी ‘गरिबी हटाव' ची आकर्षक घोषणा देऊन जनमानस काबीज करीत होत्या. विरोधकांना फक्त 'इंदिरा हटाव' हवे असे त्या सांगत व लोकांनाही ते पटे. बाईंंपेक्षाही काहीतरी मोठी झेप घेतल्याशिवाय तुमच्या पोकळ एकाधिकारशाहीविरोधाला, नकारात्मक इंदिरा हटाव भूमिकेला लोक कशी किंमत देणार ? आणि त्यांनी का द्यावी ? बेबंदशाहीपेक्षा लोकांना एकाधिकारशाही परवडते असा परवाच्या लोकसभा निवडणुकांचा स्पष्ट कौल आहे. बेबंदशाहीची आठवण करून देणारे निरनिराळे आवाजच विरोधीपक्ष यापुढेही काढत राहणार असतील तर लोकही त्यांना विरोधी पक्ष म्हणूनच फार तर जगवत ठेवतील. सत्तेवर त्यांना न बसवण्याची दक्षता बाळगतील. शेवटी राज्यकर्ता पक्ष म्हणून एक प्रतिमा तयार व्हावी लागतेच. त्यासाठी पर्यायी धोरणे, दमदार नेतृत्व, पर्यायी संघटना हा सगळाच जामानिमा खडा असावा लागतो. फुटुन वेगळे झाल्याला ४८ तासही उलटले नाहीत तो याची झाली पुन्हा चुंबाचुंबी सुरू ! अरे, मग भांडलात, वेगळे झालात ते कशासाठी : उभे राहा एकेकटयाच्या बळावर, निदान काही काळ तरी. थोडी उपाससार, हालअपेष्टा, उन्हाळा पावसाळा सहन करून लोकांना कळू द्या तुमची तत्वनिष्ठा आणि त्यासाठी किंमत मोजण्याची तुमची तयारी ! असे केले नाहीत तर लंगडे आणि आंधळे म्हणूनच लोक तुमच्याकडे पाहतील, टाकतील फार तर एखादे दुसरे नाणे पेटीत. दुबळ्यांची कीव केली जाते, त्यांना कुणी राज्यावर बसवत नाही. समाजवादी गटांजवळ तर असा काही स्वबळावर आधारित पर्यायच नसावा, अशी त्यांची युत्यांसाठी, तडजोडींसाठी धावाधाव, शोधाशोध सुरू झालेली आहे. पाहायचे आता कुणाचा घरोबा ही मंडळी धरतात. महाराष्ट्रापुरते पाहता अरस काँग्रेस त्यांना जवळची दिसते आहे. स्थळ ओळखीचे आहे. जमायला हरकत नसावी आणि महाराष्ट्राबाहेर ही मंडळी आहेत तरी कुठे फारशी ?

फुटून वेगळे झाले तरी हे दोन्ही गट गांधी, जयप्रकाशांचा वारसा आम्ही पुढे चालवू असे म्हणत आहेत. ‘नाहं कामये राज्यं' अशी गांधीजींची रोजची प्रार्थना होती व जयप्रकाशांनाही सत्तेचे रूढ मार्ग सोडून, क्रांतीचा एखादा नवा पर्याय सापडतो का, हे पाहण्याची तहान लागलेली होती.

भारतीय समाजवादाकडे । २२५