पान:निर्माणपर्व.pdf/222

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जी काही गांधी-नेहरूंच्या काँग्रेसने घालून दिलेली होती, तीच जनता पक्षही पुढे चालवीत होता. थोडा भर विकेंद्रीकरणाकडे अधिक होता एवढेच फार तर म्हणता येईल. पण भांडणे फार माजली व मध्यवर्ती सत्ताच दुर्बल झाली. देश अराजकाकडे वाटचाल करू लागला व मतदार खवळले. आजवर त्यांनी मजबूत केंद्रसत्तेच्या बाजुने कौल दिलेला होता. ७७ मध्येही त्यांनी जनता पक्षाला याचसाठी भरघोस मतांनी निवडून दिले होते. पण जनता पक्षावरचा त्यांचा विश्वास ढळला व इंदिरा गांधींकडे पुन्हा ते त्याच अपेक्षेने वळले. वास्तविक जनता पक्षाला आणखी एक संधी मतदारांनी द्यायला हरकत नव्हती, ते न्यायालाही धरून झाले असते. पण वादळाला तू थांब व विचार कर असे सांगता येत नाही. सांगून काही उपयोगही नसतो. बोलूनचालून वादळच ते. जोवर संघटित पक्षपद्धती येथे रुजत-वाढत नाही तोवर हे असेच चालायचे. एखादे निमित्त घडणार आणि लोक भावनेच्या आहारी जाऊन या किंवा त्या बाजूने सुटलेल्या लाटेत वाहत जाणार. ७७ मध्ये झालेले मतदान, हा, लोकशाहीचा विजय वगैरे आपण मानला. पण ते नकारात्मक मतदान होते. तसेच आजही नकारात्मक मतदानच झाले. जनता पक्ष नको, ती भांडणारी माणसे नकोत असे मतदारांनी ठरवले व स्थिर सरकारचे आश्वासन देणाऱ्या इंदिरा गांधींना जवळ केले. त्यातल्या त्यात चरण-चव्हाण टाईप सरकारपेक्षा लोकांनी हा पर्याय निवडला हे चांगले झाले. बळकट केंद्रसत्ता ही या देशाची मूलभूत गरज आहे. आपली घटना जरी संघराज्यात्मक (फेडरल) पद्धतीची असली तरी केंद्र बळकट राहावे अशी सर्व व्यवस्था त्यात घटनाकारांनी करून ठेवलेली आहे. अद्वातद्वा स्वातंत्र्य येथील जनसमूहांनाही मंजूर नाही. ७७ सालीही स्थिरतेसाठीच जनता पक्षाच्या पदरात एवढी बहुसंख्या मतदारांनी टाकली. जनता पक्षाने, आघाडीने म्हणा हवे तर, ही लोकांची स्थिरतेची गरज ओळखली नाही. फालतू प्रश्न निर्माण करून स्थिर सरकार मोडले. राजकारणाचा चुथडा करून टाकला. हा चुथडा पुन्हा नको, अराजक पुन्हा नको, असे लोकांनी म्हटले व इंदिरा गांधींना पुन्हा सन्मानाने बोलावले. फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी तेथील मतदारांनी द गॉलला पुन्हा बोलावले, तसेच हे इंदिरा गांधींचे पुनरागमन आहे. लोकशाहीचा अर्थ राज्यकर्ते बेजबाबदारपणा असा घेऊ लागले तर मतदारांना तरी दुसरा पर्याय काय असू शकतो ? फ्रान्स हा सुशिक्षितांचा देश आहे. आर्थिकदृष्टया प्रगत आहे. पण तेथेही राजकीय स्थैर्य हवे असे लोकांनी ठरवले व स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची ग्वाही देणाऱ्या भूमीतही द गॉलची हुकूमशाही आली. आपला तर विभूतीपूजकांचा देश. शिक्षण कमी, प्रचंड दारिद्रय. दिल्लीत कुणीतरी आपला रक्षणकर्ता आहे, तो आपले भले करील आपल्यावर होणारे अन्याय-अत्याचार निवारील, अशी मनोरचना जर येथील सर्वसामान्यांची बनली असेल, तर त्यात अस्वाभाविक असे काही नाही. हजारो

प्रतियोगी सहकारिता । २२१