अमळथ्यातील दलित रूढ अर्थाने दलित नाहीत. त्यातील काही छोटे जमीनदार आहेत आणि छोट्या-मोठ्यांची ही तेढ आहे. उघडच आहे, जातीपातींच्या भिंती कोसळतील व अमळथ्यातील सगळे छोटे, गरीब व मध्यम एकत्र येऊन बड्यांना आव्हान देतील. ग्रामीण भागात ठिकठिकाणी असे नवे चित्र उदयास येत आहे. यातून बेलछीचे हत्याकांड उद्भवले. कांझावालासारखी प्रकरणे निर्माण झाली. चित्र आता 'लोककथा ७८' प्रमाणे साधे-सरळ, एकतर्फी अन्याय-अत्याचाराचे, दडपशाहीचे राहिलेले नाही. त्यामुळे ‘लोककथा ७९' वेगळी आहे. अमळथ्याच्याच दलितांची नवी मागणी काय आहे ? 'ठीक आहे. आमच्यापैकी काहीजणांनी अतिक्रमणे केली हे खरे असेल, पण गावातल्या इतरांनी केलेल्या अतिक्रमणाचे काय ! त्यांचीही चौकशी करा आणि सगळ्यांना समान कायदा-न्याय लावा,' असे दलितमंडळी आता उघडउघड बोलू लागली आहेत. त्यांनी यासंबंधीची माहितीही जमा केली आहे. अनेकांनी खळयांसाठी सरकारी जमिनीचा वापर केलेला आहे. दोनजणांची तर पक्की घरे सरकारी मालकीच्या जमिनीत उभी आहेत. अनेक वर्षे ही अतिक्रमणे खपवून घेतली गेली. मग दलितांच्या अतिक्रमणांबद्दल गदारोळ कशासाठी ?' हा दलितांचा प्रश्न निरुत्तर करणारा आहे. आज अमळथ्यातील दलित फक्त झालेले नुकसान मागत आहेत. उद्या सरकारी जमिनींवर सधन शेतकऱ्यांनी बेकायदा बांधलेल्या घरांवर दलितांनी मोर्चे आणले, ती पाडून टाकण्याचा आग्रह धरला, तर कोणत्या तोंडाने त्यांचा निषेध करणार ? आजवर खाली दबलेला समाजस्तर असा वर उठू पाहत आहे, आक्रमक बनत आहे. पूर्वापार पुढारपण केलेला स्तर यामुळे चिडून संतापून नव्याने वर येणाऱ्या स्तराला धाकदपटशाने पुन्हा खाली दडपू पाहत आहे.
मराठवाड्यात नामांतर आंदोलनात तरी दुसरे काय घडले ?
बडे जमीनदार, सवर्णातला वरचा थर ‘धडा शिकवण्याच्या' मनःस्थितीत आहे.
दलित व मध्यम गरीब एकत्र येत आहेत. एक नवा वर्ग-वर्ण-कलह यातून ग्रामीण भागात फैलावू शकतो.
जर परंपरागत आर्थिक–सांस्कृतिक पुढारपण केलेल्या वर्गाने काळाची पावले ओळखून वेळीच सूज्ञपणा दाखवला नाही तर !
अमळथ्याला हा सूज्ञपणा दाखवला जाईल अशी अपेक्षा दलितमंडळी अद्याप तरी बाळगून आहेत.
मे १९७९