पान:निर्माणपर्व.pdf/219

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 समजा, असे काम मिळाले, चालू संघर्षात ही मंडळी दलितांच्या बाजूने उभी राहिली तर तयार होणारे राजकीय चित्र कसे असेल ?


 आम्ही बसलो होतो, गप्पा सुरू होत्या, तेवढ्यात जळगावचे वृत्तपत्र आले. अमळथे प्रकरणी जळगावला संघर्ष वाहिनीच्या तरुणांनी उत्तमरावांना अडवून काही प्रश्न विचारल्याची बातमी पहिल्या पानावर ठळक अक्षरात या वृत्तपत्राने दिली होती. या तरुणांचे कौतुक होत होते व बातमीही मोठ्या चवीने वाचली जात होती.

 राजकारणाचे असे रागरंग या अमळथा प्रकरणात मिसळू लागलेले आहेत.


 अमळथ्याहून निघताना मी सवर्ण समाजापैकी काही शेतकऱ्यांना विचारले, 'हा प्रकार यंदाच का व्हावा ? जमिनी तर गेली वीस वर्षे दलित-हरिजन यांच्याकडे होत्या. अशी उभी पिके तुडवून-लुटून नेली असे पूर्वी कधी घडले नाही. मग यंदाच हा हल्ला का ? ' या शेतकऱ्यांनी दिलेले उत्तर नव्या संघर्षावर चांगलाच प्रकाश टाकणारे आहे. ते म्हणाले; 'यंदा पीक जबरदस्त आले होते. मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतातही असे जोरदार पीक इतक्या वर्षात आलेले कुणी पाहिले नव्हते. पीक पाहून डोळे फाटून जात होते. नदीकाठच्या जमिनी. शिवाय यंदा गाळ साठून आला. त्यामुळे हा चमत्कार घडून आला असावा. हेवा वाटणे, मत्सर जागा होणे अगदी स्वाभाविक होते. बडे जमीनदार आतून जळत होते. एवढे पीक हरिजनांच्या-दलितांच्या घरात गेले तर आणखीनच माजल्याशिवाय कसे राहतील ? शिवाय वर्षभर ते कोणाकडे कामालाही येणार नाहीत. हा व्यावहारिक हिशोब आणि हेवा-मत्सर यामुळे परंपरागत पुढारपण केलेल्या पाटीलमंडळींची डोकी भणाणून गेली आणि त्या पिके उध्वस्त करून आपली आग शांत करून घेतली. एका दगडात दोन पक्षी मारले.


 बेलछीला माणसांची हत्या झाली.
 अमळथ्याला पिकांची नासधूस-लूट झाली.
 आविष्कार वेगळे.
 मनोवृत्ती एकच.

निर्माणपर्व । २१८