पान:निर्माणपर्व.pdf/218

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अमळथ्याला पोलीस पाटलाच्या घरी आम्ही बोलत बसलो होतो. पोलीस पाटील यांना या प्रकरणी निलंबित केले गेलेले आहे. जमीनदार मंडळींनी केलेल्या अत्याचाराची, पिकाच्या लुटालुटीची हकीगत त्यांनी वेळेवर वरिष्ठांना कळविण्यात हलगर्जी केली, म्हणून ही शासकीय कारवाई तडकाफडकी करण्यात आली, असे कळले; पण वस्तुस्थिती वेगळी असावी. दलितांच्या बाजूने हे पोलीस पाटील सुरुवातीला मध्यस्थी करीत होते. दलितांनाही त्यांची मदत होत असे. यांचा आणखी एक अपराध म्हणजे यांचे बंधू गावातल्या विरुद्ध पार्टीचे आहेत व सध्या या पार्टीचे इंदिरा काँग्रेसशी सख्य आहे, हा. या भागात असे चित्र बऱ्याच ठिकाणी आढळते. जनता पक्षावर नाराज असलेले सरळ इंदिरा काँग्रेसला जवळ करतात. अमळथ्यालाही चित्र वेगळे नाही. जमीनदारांच्याच दोन फळ्या, पण एक जनताकडे व दुसरी इंदिरा काँग्रेसकडे, यांची गावातली नावे सरपंच पार्टी आणि पोलीस पाटील यांची पार्टी. आम्हाला पोलीस पाटील भेटले नाहीत. ते बाहेर गेलेले होते. त्यांचे बंधू भेटले. ते नुकतेच इंदिरा काँग्रेसच्या ‘जेलभरो' आंदोलनात सहभागी होऊन सुटून आले आहेत. आपला पोलीस पाटील भावाचा निष्कारण राजकीय बळी दिला गेला आहे असे त्यांचे मत आहे व तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी या मताला पुष्टीही दिली. ही सगळीच मंडळी व त्यांची गावातली साथीदार पार्टी नुकसान भरपाईच्या प्रश्नावर दलितांच्या बाजूने आज उभी राहायला तयार आहे. त्यांचे म्हणणे झाल्या प्रकाराबद्दल सर्व जमीनदारवर्गाला सरसकट दोषी धरणे चूक आहे. फक्त जयसिंगराव पाटलांच्या गटाने म्हणजे सरपंच पार्टीने हा अत्याचार घडवून आणला, पिके लुटून आणली, याच गटाकडून सर्व नुकसान भरपाई वसूल केली गेली पाहिजे. तहसीलदाराने या मंडळींनाही नुकसान भरपाईबाबत चाचपडून पाहिले, पण या मंडळींनी दाद दिली नाही. मी त्यांना विचारले, “तुम्ही हे जाहीरसभेत सांगाल का ? किती लोक तुमच्या मताचे असतील ?' त्यांनी होकार दिला व संख्याही खूप सांगितली. मी त्यांना पुढे विचारले, 'तुम्ही दलितांना काम का नाकारले ? ' 'जयसिंगराव गटाने नाकारले असेल. आम्ही तर उद्यासुद्धा काम देऊ !' असे या मंडळींनी सांगितले. शहानिशा करून घेण्याइतका वेळ नव्हता. पण गोविंदरावांच्या डोक्यावरचे एक ओझे या आश्वासनामुळे थोडे हलके होणार होते. दलितमंडळींना काम मिळवून देण्यासाठी त्यांना आता रोजगारमंत्र्यांचे पाय धरावे लागणार नव्हते. एकदा तेही करून झाले होते, पण सात मैलांवर काम काढू असे सांगितले गेले. एवढ्या लांबवर दलितमंडळी अजून जायला तयार होत नव्हती. उधारउसनवारी करून अद्याप दिवस ढकलता येत होता. आता गावातच काम मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

अमळथे । २१७